मुंबई

पालघर जिल्ह्यातील पाच आरोग्यकेंद्रात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

विक्रमगड(सचिन भोइर)-पालघर जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत.

पालघर जिल्ह्यातील मलवाडा, नांदगाव, गंजाड, मासवण, तलवाडा या आरोग्य केंद्रांना या बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत. या बाईक अ‍ॅम्ब्युलन्समध्ये लहान आकाराचे ऑक्सिजन सिलिंडर, विविध प्रकारचे स्प्रे, इमर्जन्सी काही मेडिसीन, रुग्णांना तपासणी करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच काही मेडिकल वस्तू असणार आहेत. या अ‍ॅम्ब्युलन्सला जीपीएस सिस्टीम लावण्यात आली आहे. याचे कंट्रोल महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 108 क्रमांकावर फोन करून ही सुविधा मिळविता येईल. विशेषकरून या अ‍ॅम्ब्युलन्सवर एका डॉक्टराची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या भागात गरोदर मातांना सुविधांअभावी जीव गमवावा लागतो, ज्या मातांना दवाखान्यात येणे शक्य नाही, त्या ठिकाणी डॉक्टर जाऊन त्या महिलेची प्रसूती करणार आहेत.