असे असेल निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जींचे आयुष्य

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाप्रणित रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचीच गुरुवारी निवड झाली आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांचा कार्यकाळ उद्या म्हणजेच २४ जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. आपल्या मनात प्रश्न असेलच की निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जी किंवा इतर राष्ट्रपतींना कोणत्या सुविधा मिळतात? रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन मिळतं का? याच सर्व प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

प्रेसिडेंट इमॉल्युमेंट अ‍ॅक्ट १९५१ या कायद्यानुसार पूर्व राष्ट्रपतीला पूर्ण सन्मानानुसार राहण्यास सुसज्ज घर मिळते. त्याचबरोबर २ टेलिफोन, एक नॅशनल रोमिंग फ्री मोबाईल फोन, १ सेक्रेटरी आणि ४ खाजगी कर्मचारी, ऑफिस खर्चासाठी प्रत्येकी वर्षाला ६०,०००, एक कार आणि ७५ हजार रुपये (पूर्ण सॅलरीचे अर्धे) पेन्शन देण्यात येते. या सर्व सुविधा रिटायरमेंटनंतर प्रणव मुखर्जींना मिळणार आहेत. कायद्यानुसार वैद्यकीय सेवा तसेच पूर्ण देशात कुठेही फिरण्याची मोफत सुविधा पूर्व-राष्ट्रपतींना मिळते. रेल्वे, विमान, जहाज, इ. अशा देशभरात केलेल्या कोणत्याही प्रवासात राष्ट्रपतींना प्रथम श्रेणीत प्रवास करण्याची मुभा आहे.

१० राजाजी मार्ग या दिल्लीतल्या निवासस्थानी प्रणव मुखर्जी यापुढे राहणार आहेत. एकेकाळी या बंगल्यातच ए.पी.जे अब्दुल कलामजी राहत होते. या नव्या घरात प्रणव मुखर्जी आपला पूर्ण वेळ वाचन आणि लिखाण यात घालवणार आहेत. त्यांच्या पुढील जीवनासाठी या बंगल्यात पूर्ण व्यवस्था केली गेली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती प्रतिभा पाटील या निवृत्त झाल्यानंतर पुण्यात राहायला लागल्या आणि पुण्यातले त्यांचे निवासस्थान हा मोठाच वादाचा विषय झाला. कारण त्यासाठी त्यांना जी जागा देण्यात आली ती सैनिकांसाठीची जागा होती. त्यांच्या पूर्वीचे राष्ट्रपती एपीजे अब्दुलकलाम यांच्याबाबतीत कसलाही वाद निर्माण झाला नाही. कारण डॉ. कलाम यांचे राहणीमान फारच साधे होते. ते राष्ट्रपती असताना सरकारने नेमून दिलेला पगार घेत नसत आणि केवळ लाक्षणिकरित्या सरकारी खजिन्यातून दरमहा एक रुपया एवढे वेतन घेत असत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवेतनाचाही प्रश्‍न निर्माण झाला नाही.

नारळासमोरील बटन दाबलं तरी भाजपला मत, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली.

राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपाला मिळालेल्या आश्चर्यकारक निकालांचा बुरखा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयानेच फाडला आहे. कारण बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली.

बुलडाण्यातील सुलतानपुर जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्यात निवडणूक झाली होती. मात्र, नारळासमोरील बटन दाबल्यास कमळाच्या चिन्हावर लाईट लागल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

2017 मध्ये महाराष्ट्रासह देशभरात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. याशिवाय पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठं यश मिळालं होतं. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएममध्येच घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता. ईव्हीएम मशिनमधील कोणतंही बटण दाबल्यास भाजपलाचं मत दिलं जातंय, असा आरोप विरोधकांनी केला होता.

पण निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले होते. विशेष म्हणजे, आयोगानं विरोधकांना ईव्हीएममध्ये छेडछाड करुन दाखवण्याचं आव्हानही दिलं होतं. हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्यानिस्ट पक्षानं उचललं होतं.

यासाठी आयोगाच्या वतीनं आयोजित हॅकेथॉनमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड करुन दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांना चार-चार तासाचा वेळ दिला होता. पण दोन्ही पक्ष हे आव्हान पूर्ण करण्यात असमर्थ ठरले होते.

पण आता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानंच आयोग आणि भाजपच्या यशाचा बुरखा टराटरा फाडला आहे. ईव्हीएम मशीनमधील कोणतंही बटण दाबल्यास कमळाच्या चिन्हा समोरचा लाईट लागत असल्याचं चौकशी अहवालात नमुद केलं आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांमध्ये फूट!

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांमध्ये फूट!

मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राष्ट्रवादीची अनुपस्थिती दिसून आली.

अधिवेशनापूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदाही दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या होणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील वेगळी पत्रकार परिषद घेतील. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही वेगळी पत्रकार परिषद घेणार आहेत.

कर्जमाफीसारखे अनेक प्रश्न या अधिवेशनात विरोधकांच्या हातात आहेत. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांमध्ये फूट पडली आहे. विरोधी पक्षांनी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. मात्र राष्ट्रवादीने आपली पत्रकार परिषद 4 वाजता होणार असल्याचं घोषित केलं.

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. तर तिकडे आज संध्याकाळी सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूर खरेदीचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घोटाळे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यापूर्वी विरोधकांमधील फूट समोर आली आहे.