पोटाचा घेर कमी करण्यासाठी

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी

पोटाचा घेर कमी करण्यासाठी

* व्यायाम  करणे, २४ x ७ आनंददायी  राहणे

* खरी भूक लागल्यावर आणि प्रसन्न चित्ताने, सावकाश खाणे.
* पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम घेणे.

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!
आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.
पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! मी स्वत: सुद्धा २०११ मध्ये धोक्याच्या पातळीवर होतो. माझ्या पोटाचा घेर ९६ सेंमी (३८ इंच) होता. आज मात्र मी तो ८६ सें.मी.वर (३४ इंच) आणला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांची ही स्थिती आहे, तर इतरांबाबत काय बोलणार? खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते. मग नेमके करावे तरी काय? 

प्रयत्नांची दिशा – 
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
पोटाचा घेर वाढलेल्या व्यक्तीची मानसिकता – 
‘मी आता असाच- ढेरीसकट मरणार’, ‘आता माझ्या पोटाच्या घेरात फरक पडणार नाही’ अशी नकारात्मक

भावनाच सर्वसाधारणपणे आढळून येते. २०११ पर्यंत माझी मनस्थिती सुद्धा अशीच होती! वेगवेगळ्या पद्धती अवलंबूनही काहीच फरक न पडल्यामुळे ढेरी वाढलेल्या व्यक्ती हताश, निराश झालेल्या असतात. त्यात बऱ्याच जणांनी लाखभर रुपये खर्चही केलेला असतो. त्यामुळे त्यांचा स्वत:वरचा व अशा प्रकाराची सेवा देणाऱ्यांवरचाही विश्वास उडालेला असतो. त्यात भरीस भर म्हणून या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते. 
आता पोटाचा घेर कमी करण्याचे सार पाहू 
या – व्यायाम + दररोज  १२ सूर्यनमस्कार + आनंददायी २४x७! 
खरी भूक लागल्यावर हवे ते- 
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!
व्यायाम + आनंददायी २४x७  :
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा. 
खरी भूक लागल्यावर : 
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?- 

शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.

पोटाचा घेर कमी करण्यासाठी
पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम:
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात    ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य हमखास सुधारेल!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s