सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगावसाठी उद्या मतदान

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेसाठी उद्या सकाळी ०७:३० वाजल्यापासून सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. दोन्ही ठिकाणी एकूण सात लाख ८९ हजार २५१ मतदार आहेत. त्यासाठी १०१३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ५ हजार ७९२ अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सांगली-कुपवाड आणि मिरज महापालिका

एकूण प्रभाग – २०, जागा – ७८, उमेदवार – ४५१, मतदार – ४लाख २४ हजार १७९, मतदान केंदे – ५४४

जळगाव महापालिका

एकूण प्रभाग – १९, जागा – ७५, उमेदवार – ३०३, मतदार – ३ लाख ६५ हजार ७२, मतदान केंदे – ४६९

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मुंबई – राज्य सरकार किंवा अन्य कुणीही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कुठल्याही समाजाच्या आताच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या कार्यवाहीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे. हा अहवाल लवकर देण्याची आयोगाला विनंती करण्यात येईल. हा अहवाल आल्यानंतर त्याची तत्परतेने छाननी केली जाईल आणि विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा कायदा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गेली दोन-अडीच वर्षे शांततेत आंदोलन करूनही आरक्षणचा विषय मार्गी लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या मराठा समाजाच्या संयमाचा उद्रेक झाल्याने तापलेले वातावरण शांत करण्यासाठी आता सरकारची धावपळ सुरु झाली आहे. आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, रामदास कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते यावेळी उपस्थित होते.

राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोगाने आपला अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी विनंती चंद्रकांत पाटील यांच्या समितीने केली आहे. आयोगाने देखील तो लवकर देण्याचे सूतोवाच केले आहे. गटनेत्यांच्या बैठकीत जो ठराव संमत झाला आहे तो देखील आयोगाला देण्यात येईल. अहवाल लवकर सादर करावा, अशी विनंती पुन्हा आयोगाला करण्यात येईल. आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आयोग सुचवेल त्यानुसार नवीन कायदा किंवा ठराव संमत करण्यात येईल. न्यायालयात कायदा टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पोलिसांवरील हल्ला, जाळपोळ, वाहनांची तोडफोड इत्यादी मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांना आपण तसे निर्देश दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये मेगाभरती होणार आहे. एससी,एसटी,ओबीसींना ही भरती व्हावी असे वाटते आहे. मराठा समाजाचा देखील या भरतीला विरोध नाही. मेगाभरतीबाबत मराठा समाजाच्या मनात जो संभ्रम आहे तो पूर्णपणे दूर करण्यात येईल.मराठा समाजासाठी त्यात जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.या जागा इतर कोणालाही देण्यात येणार नाहीत.मराठा समाजाने याबाबतचा संभ्रम मनातून पूर्णपणे काढून टाकावा असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टोकाची भूमिका नको
राज्यात पूर्णपणे शांतता प्रस्थापित व्हावी. कोणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेऊ नये असे, आवाहनही गटनेत्यांच्या बैठकीतून करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचेच एकमत असून राज्य शासनाने याबद्‌दल त्वरेने कार्यवाही करावी व विरोधी पक्षदेखील त्याकरिता राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल अशा प्रकारचाही निर्णय एकमताने या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

१ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन; मराठा समाज

मुंबई – मराठा आरक्षण मुद्यावरून आंदोलन चिघळत असताना सकल मराठा समाजाकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत हा इशारा सरकारला देण्यात आला.

दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह हेही उपस्थिती लावणार आहेत.

वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी दिला राजीनामा

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. चिकटगावकर यांनी ई मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे. वैजापूर येथील आंदोलनादरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या राजीनाम्यांमुळे सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाब वाढू शकतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. आज दुपारी मराठा आरक्षण अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदाराचा हा दुसरा राजीनामा ठरला आहे.

सुरज गायकवाडच्या “ ग्लोबल वार्मिंग” पेंटिंगचा देशात प्रथम क्रमांक


केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय व शिवशक्ती सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ एप्रिल रोजी गो ग्रीन गो क्लीन संकल्पनेवर आधारित पर्यावरणीय समस्या व जागतिक तापमानवाढ, स्वच्छता आदीविषयक प्राथमिक लेवल १, माध्यमिक लेवल २ व उच्च माध्यमिक लेवल ३ आदी गटांमध्ये शासकीय आयटीआय कडेगांव येथे चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सुरज अशोक गायकवाड या विद्यार्थ्याच्या ग्लोबल वार्मिंग या पेंटिंगला प्रथम क्रमांक देनेत आला होता. व अन्य क्रमांक निवड करून सदर पेंटिंग राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय दिल्ली येथे पाठवण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सुरज अशोक गायकवाड याच्या ग्लोबल वार्मिंग विषयी पेंटीगची देशात प्रथम क्रमांकाने निवड केली आहे.
दि. २७ जुलै पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिवशी दिल्ली येथे केंद्रीय पृथ्वी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये सुरज गायकवाड याला सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सुरज गायकवाडच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवशक्ती सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मांडवे, सचिव श्रीकांत महाडिक तसेच सर्व विश्वस्त यांनी सुरजचे अभिनंदन केले. तसेच शासकीय आयटीआयचे पेंटर निर्देशक विवेक चंदालिया यांनी मार्गदर्शन केले.

पुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका सुटका

पुणे: मुंढवा येथील केशवनगर परिसरात असणारी जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. तर आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शोध कार्य सुरू आहे.

केशवनगर परिसरात असणारी जुनी इमारत दुपारी एकच्या सुमारस अचानक कोसळली. यावेळी इमारतीमध्ये असणारे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले गेले. यामधील नऊ जणांची सुटका करण्यात आली आहे. तर इमारतीखाली असणाऱ्या गोट्यामधील ३ ते ४ जनावरे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जानकरांचा भाजपच्या आमदारकीचा राजीनामा !

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून (रासप) अर्ज भरल्यानंतर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज भाजपकडून मिळालेल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. एका पक्षाचा आमदार असताना दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी भरल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्ष अपात्र ठरण्याचा धोका असल्याने त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

आमदारकीचा राजीनामा दिला तरी त्यांच्या उमेदवारीचा पेच मात्र कायम आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणूकीतून अतिरिक्त उमेदवार म्हणुन जानकर माघार घेणार की पृथ्वीराज देशमुख…याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय समितीकडून घेतला जाणार असल्याने टांगती तलवार कायम आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार सहज निवडुन येत आहेत. यात भाजपने मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली. तर पृथ्वीराज देशमुख यांनी सहावा उमेदवार म्हणुन अर्ज भरला आहे. दोन वर्षापुर्वी जानकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडुन आले होते. त्यामुळे त्यांच्यावर रासपमधुन प्रचंड टीका झाली होती.

ही चुक परत होऊ नये यासाठी जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत रासपाकडून उमेदवार अर्ज भरला आहे. परंतू, भाजपच्या आमदारकीचा राजिनामा न देता रासपाचा अर्ज भरल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्षांची बंदी असती, त्यामुळे जानकर यांनी गुरुवारी सकाळी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यानंतर रासपाचा अर्ज भरला. आज विधानपरिषदेत सभापतींनी निवेदन करून जानकरांचा राजीनामा मान्य केला.

भाजपाचा आमदार झालो तेंव्हाच पुढच्या निवडणुकीत मी रासपकडून निवडणूक लढवणार, हे स्पष्ट केले होते. त्यानुसार यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच एक घटक पक्ष आहे व पुढेही राहणार आहे. महाराष्ट्रात रासपचे 95 नगर परिषद सदस्य आहेत. आमचे दोन आमदारही आहेत. देशात सतरा राज्यात माझ्या पक्षाचे काम आहे. आमच्या पक्षाला भाजपाचा मित्र पक्ष म्हणून पुढे निवडणुकाही लढवायच्याच आहेत. त्यामुळे मी माझ्याच पक्षाच्या तिकिटाखाली परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व त्याला मुख्यमंत्र्यांनीही संमती दिल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ही निवडणुक 100टक्के बिनविरोध होणार असे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.जानकरांनी माघार घेतली तरी त्यांच्या मंत्रीपदाला सहा महिने धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लॅस्टिक बंदी

लखनऊ – महाराष्ट्रात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही योगी सरकारने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 जुलैपासून करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकबंदी लागू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील 19वे राज्य ठरले आहे.
महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्याला 5 हजारांपासून 25 हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अशी काही नियमावली उत्तरप्रदेश सरकारने म्हणजेच योगी आदित्यनाथ सरकारने तयार केली आहे का? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आता उत्तरप्रदेशात 15 जुलैपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकबंदीचे स्वागत होते की विरोध हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली जाते की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेणार हे देखील येत्या काळात स्पष्ट होईलच. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारतर्फे आजच हा आदेश जारी करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटर वर असे म्हणटले आहे की,
असे ट्विटही यांनी केले आहे.

देहूनगरीत वारकरी दाखल

पुणे : आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहे.

खंडाळ्यात मदुराई एक्स्प्रेसचा डबा घसरला; काही रेल्वे गाडया रद्द

पुणे – मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास अपघात झाला. यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल, भुसावळ पुणे एक्स्प्रेस व मुंबई पुणे, पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मदुराई एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. दुराई एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत असताना खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक मागील डब्याला बसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घसरलेला डब्बा मार्गावरुन हटवण्यात आला असून पावणेसहाच्या सुमारास मदुराई एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र, या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून काही रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.