सांगलीत आठ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे आठ जणांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या नवऱ्याला कारमध्ये बांधून या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे ही संतापजनक घटना घडली. पीडीत महिला साताऱ्यातील माण तालुक्यातील आहे. ही महिला आणि तिचा नवरा पोटापाण्यासाठी तुरची फाटा येथे राह्यला आले होते. त्यांनी या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना विवाहित जोडप्याची गरज होती. त्यांनी त्याबाबत काही ग्राहकांना सांगूनही ठेवले होते. मुकुंद माने नावाच्या संशयित व्यक्तीने या महिलेच्या पतीला फोन करून कामासाठी जोडपं मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुरची फाट्यावर दोघांनाही बोलावून घेतलं. येताना सोबत २० हजार रुपये आणण्यासही सांगितले होते. त्यानुसार सदर महिला आणि तिचा पती तुरची फाट्यावर गेले असता आठ जणांनी या दोघांना प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केली. त्यानंतर या महिलेच्या पतीला कारमध्ये बांधून डांबले आणि या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी या महिलेने मोठमोठ्याने टाहो फोडला. ‘मी आठ महिन्याची गर्भवती आहे. मला सोडा… मला सोडा…’ अशी गयावयाही या महिलेने केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या महिलेने सदर घटनेची तासगाव पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचं सांगतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर शिवसेना प्रवक्त्या, आमदार नीलम गो-हे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच महिला दक्षता समित्या आणखी सक्षम करण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई आणि सांगलीतील आरोपींच्या शिक्षेचं प्रमाण ८ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांवर गेल्याचंही गो-हे यांनी निदर्शनास आणून दिलं.

आता धनगर समाजही आक्रमक: पडळकरांचा भाजपला घरचा आहेर

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता धनगर समाजानेदेखील मराठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात म्हणून १ ऑगस्टला पुण्यात ‘अखेरची लढाई ’ या बॅनरखाली परिषद होणार असून त्यानंतर सलग १०० दिवस म्हणजे १० डिसेंबरपर्यंत आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती या परिषदेचे समन्वयक गोपीचंद पडळकर यांनी दिली. पडळकर हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष असून भाजपला हा घरचा आहेर असल्याचे समजले जात आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्य सरकारने विधानसभेमध्ये धनगड व धनगर हे वेगवेगळे समाज आहेत. या दोन्ही समाजांच्या चालीरिती वेगळ्या असून त्या एकजात नाहीत, असे स्पष्ट केले आहे. या उलट धनगड म्हणजेच धनगर आहेत असे आमचे म्हणणे आहे . आम्ही राज्यातील ३५८ तहसिलदारांना धनगड दाखला दिला आहे काय? असा प्रश्‍न विचारला होता. ३६ जिल्हाधिकार्‍यांनादेखील आम्ही हाच प्रश्‍न विचारला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जात पडताळणी प्रमुखांनादेखील आम्ही हा प्रश्‍न विचारला. जनगणनेचीही माहिती घेतली. त्यावेळी धनगड जातीचा एकही दाखला राज्यात दिला गेलेला नाही, तर त्यांची लोकसंख्या जनगणनेत निरंक अशी सांगितली गेली, याचाच अर्थ राज्यात जो धनगर समाज आहे तोच खरा आहे . धनगड अशी जात नाही. याच मुद्यावर आता आमचे आंदोलन तीव्र होईल.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी त्वेषाने रस्त्यांवर उतरला असताना आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट झाले. सत्ता आल्यानंतर वर्षभरात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपा सरकारने गेली चार वर्षे टिसच्या (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स) अहवालाचा संदर्भ देत वेळकाढूपणा केल्याने राज्यभरातील धनगर समाज संतप्त झाला आहे.

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून 20 जण ताब्यात 

पुणे :

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्‍या चाकण बंद दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 20 जणांना ताब्‍यात घेतले आहे. सोमवार (30 जुलै)च्या घटनेत वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणाऱया 100 हून अधिक तरुणांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून, सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करून नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पोलीस अधीक्षक पाटील यांनी जिह्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ही घटना घडली असून, परवापासून ते येथे ठाण मांडून आहेत. जुन्नर तालुक्यात मराठा मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त पाठवून ते स्वतः वायरलेस यंत्रणेवर बसून संपूर्ण जिह्यावर नियंत्रण ठेवत होते.

तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची संयुक्त समिती करून अजूनही पंचनामे सुरू आहेत. अजूनही गाड्या तोडफोडीच्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या घेऊन पोलीस पथक पंचनामा करीत आहे. चाकणमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आली असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. परिसरातील शाळा-महाविद्यालये व औद्योगिक कंपन्या सुरळीतपणे चालू झाल्या आहेत. महामार्गावर तसेच सर्व चौकांत आणि मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेत नुकसान झालेल्या लोकांना पंचनामा व इतर कागदपत्रे देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.