मरीना बीचवर होणार करुणानिधींच्या पार्थिवाचं दफन, मद्रास हायकोर्टाचा निर्णय

तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद पाचवेळा भूषवणारे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते तसंच द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी निधन झाले. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार असून शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आहे. याआधी अभिनेता रजनीकांत, कमला हासन यांनीदेखील अंत्यदर्शन घेतलं.

दरम्यान करुणानिधींची समाधी मरीना बीचवरच होणार आहे. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर मद्रास उच्च न्यायालायने हा निर्णय दिला. राज्य सरकारने नकार दिल्याने हा वाद न्यायालयात गेला होता. न्यायालयाने निर्णय देताच समर्थकांच्या भावना अनावर झाल्या.