हिना गावित हल्ला प्रकरण चार जणांवर ऍट्रॉसिटी दाखल

नंदुरबारच्या भाजपा खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धुळ्यामध्ये रविवारी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला केला होता. हल्ला झाला त्यावेळी गावित या स्वतः गाडीत होत्या. त्यानंतर हे प्रकरण थेट लोकसभेत गेले आणि स्वत: हिना गावित यांनी या प्रकरणात हल्लेखोरांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकसभेत बोलताना केली होती. तसंच एखाद्या महिलेला सुरक्षा देता येत नसेल तर तेथील पोलीस अधिकार्‍याची बदली करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर तातडीने कारवाई करत संध्याकाळीच धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली होती.
यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजातील प्रतिनिधींनी हिना गावित यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे. यावेळी बोलताना मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडत घडलेला प्रकार अनावधानाने घडल्याचे सांगत कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचेही सांगितले. आम्ही छत्रपतीच्या शिवरायांच्या विचारांचे आहोत. परस्त्रीचा सन्मान केला पाहिजे. तिला माता भगिनी समान मानलं पाहिजे. कोणत्याही महिलेविरुद्ध मराठा समाजातील कोणताही कार्यकर्ता अशा प्रकारे कृत्य करणार नाही, ज्यामुळे त्या महिलेला त्रास होईल किंवा तिला वेदना होईल किंवा तिच्या जिवाला धोका पोहचेल. आमच्या मनात कोणाबद्दल काहीही नव्हते असे स्पष्टीकरण मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या हल्ल्याबद्दल बोलताना दिले.

Continue reading “हिना गावित हल्ला प्रकरण चार जणांवर ऍट्रॉसिटी दाखल”