शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप

कश्मीरच्या बंदीपुरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर मीरा रोड येथील वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत हजारोंनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या जवानांनी बंदुकीतून २१ गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी दिल्यानंतर राणे यांचे वडील प्रकाश आणि मुलगा अगस्त्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले. सकाळी ६ वाजता शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून मीरा रोड येथील हिरल बिल्डिंग या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सकाळी ७ वाजल्यापासून ९.३० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सोसायटीच्या आवारात दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी हजारोंनी गर्दी करून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, कपिल पाटील, नरेंद्र मेहता यांच्यासह लोकप्रतिनिधींनी शहीद कौस्तुभ राणे यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

• बहिणीने चितेवर ठेवले घड्याळ आणि कॅडबरी

कौस्तुभ यांची बहीण कश्यपी हिने दादासाठी एक घड्याळ भेट म्हणून घेतले होते. तो घरी आला की ही भेट ती त्याला देणार होती, पण घरी आले ते कौस्तुभ यांचे पार्थिव. त्यांच्या चितेला अग्नी देण्यापूर्वी कश्यपी हिने ते घड्याळ व त्याला आवडणारी कॅडबरी त्यांच्या पार्थिवाशेजारी ठेवली. हे दृश्य पाहून उपस्थितांना हुंदके अनावर झाले.लष्कराच्या जवानांनी हार, फुलांनी सजवलेल्या ट्रकवर त्यांचे पार्थिव असलेली शवपेटी खांद्यावरून नेऊन ठेवली. यावेळी कौस्तुभ यांची पत्नी कनिता, वडील प्रकाश, आई ज्योती, बहीण कश्यपी यांच्यासह उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. ट्रकवर लष्कराचे अधिकारी तिरंगा फडकवत होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर मीरा-भाईंदरकरांनी फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

  • स्मशानभूमीत प्रचंड गर्दी

अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा गर्दीला आवरणे कठीण झाले. राणे यांच्या कुटुंबीयांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यानंतर जमाव शांत झाला. कौस्तुभ यांच्या संपूर्ण कुटुंबाने पुढे येऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यांची पत्नी कनिता यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी दोन वर्षांच्या चिमुकल्या अगस्त्यचा माथा कौस्तुभ यांच्या पार्थिवावर टेकवला. वीरमाता ज्योती यांचा आक्रोश हेलावून टाकणारा होता.

  • कौस्तुभ यांची पत्नी कनिता, वडील प्रकाश, आई ज्योती, बहीण कश्यपी यांच्यासह उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.
  • लष्कराच्या जवानांनी बंदुकीतून २१ गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी दिली.