वाजपेयींच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान हा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास होता. प्रकृती अस्वास्थामुळे गेले ९ आठवडे दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी ( आज ) संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी जाहीर केले. शुक्रवारी ( उद्या ) संध्याकाळी राजघाटावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ६ ते ९ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार्थिव भाजपच्या केंद्रीय कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरूवात करण्यात येईल.

अटबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर भारतीय राजकारणातील भीष्मपितामह हरपला अशी प्रतिक्रिया सर्व क्षेत्रातून येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. गानकोकीळा लता मंगेशकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील अटलबिहारी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

अजातशत्रु व्यक्तिमत्व

राजकारणातील अजातशत्रु व्यक्तिमत्व म्हणजे अचलबिहारी वाजपेयी. कवी, पत्रकार, राजकारणी असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पोखरण अणुचाचणी, लाहोर बस सेवा, काश्मीर प्रश्नी संवादाची भूमिका, संसदेवरील हल्ला, कंदार विमान अपहरण आणि कारगिल युद्ध यासारख्या अनेक घटना या अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घडल्या. या प्रत्येक समस्येला अटलबिहारी वाजपेयी यांनी तितक्याच तडफेने उत्तर दिले.