वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या मतीन सय्यदला अटक

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा औरंगाबाद महानगरपालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी मारहाण करण्यात आली होती. यानंतर मतीन याच्या समर्थकांनी महापालिकेच्या परिसरात प्रचंड धिंगाणा घातला होता. याप्रकरणी शनिवारी पोलिसांकडून मतीन याला अटक करण्यात आली.

महापालिकेच्या विशेष सभेत शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र, सय्यद मतीन याने त्याला विरोध करत आरडाओरड सुरु केली. ते ऐकताच उपमहापौर विजय औताडेंसर इतर संतप्त नगरसेवक मतीन याच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मतीन यांना मारहाण करत सभागृबाहेर पिटाळून लावले.

यानंतर सय्यद च्या समर्थकांनी महापालिकेबाहेरही धिंगाणा घातला. त्यांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली.भाजप नगरसेवकांकडून ‘प्रसाद’ मिळूनही मतीन याचा उन्माद कमी झाला नाही. उलट त्याने व्हिडीओ प्रसिद्ध करून ‘हो, मी केला विरोध’ अशी उद्दाम भाषा तर केलीच पण ‘मी एकटा होतो, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’, अशी दर्पोक्तीही केली होती. तक्रार उपमहापौर विजय औताडे यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी या प्रकरणाचा तपास करून सय्यद मतीन यास अटक केली.

यानंतर सय्यद मतीन याचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तसेच मतीन याला भविष्यात महापालिकेत येण्यास बंदी घालत असल्याचे आदेशही काढण्यात आले आहेत.सय्यद मतीन याने महापालिकेत जो प्रकार केलाय त्याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचा खुलासा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय.