‘मी इथे आलोय तर तुमचा आवाज दिल्लीत पोहोचलाच असेल’ – हार्दिक पटेल

‘यळकोट यळकोट.. जय मल्हार’ या घोषणेने सुरुवात करत धनगर समाजामध्ये प्रचंड आकर्षण असलेला पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलने आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. सत्ता मिळविण्यासाठी धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून फसवणूक करणार्‍या भाजपला घरी बसवा, असे आवाहन करत त्याने ‘मी इथे आलोय तर तुमचा आवाज दिल्लीत पोहोचलाच असेल’, अशी मल्लीनाथी केली. हार्दिक पटेलच्या भाषणाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आरेवाडीतील धनगर मेळाव्याचे संयोजक गोपीचंद पडळकर यांनी जर भाजपने आरक्षण दिले नाही तर भाजपचा एकही आमदार, खासदार निवडून येता कामा नये. भाजपला मते देवू नये यासाठी सर्वांना बिरोबाची शपथ दिली.

धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे, तो न दिल्यास धनगरांनो, भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाड़ा, असे आवाहन गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केले. गोपीचंद पडळकर यांच्या दसरा मेळावा कार्यक्रमात आरेवाडी येथे ते बोलत होते.

‘यळकोट-यळकोट जय मल्हार…’

आरक्षणाच्या नावानं चांगभलं…

यावेळी बोलताना पटेल म्हणाले की, धनगर समाजाच्या मेळाव्यातील ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ चा आवाज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानात गेला पाहिजे. मी गोपीचंद पडळकरना सांगितले, भाजपचे लोक धोकादायक आहेत. भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. धनगर समाजाची लढाई न्यायाची, अस्तित्वाची आहे . सत्तेसाठी या भाजपच्या लोकांनी अनेकांच्या हत्या केल्या. कट कारस्थाने केली. मला देशद्रोही ठरवलं. आम्ही जागरूक नसल्याने ही असली गाढ़व निवडून देतो म्हणूनच या लोकांच फावतं. गोपीचंदसारखा तरुण तुमच्यासाठी लढतोय त्याच्या पाठीमागे उभे राहा. शिवरायांच्या महाराष्ट्रातील तुम्ही अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहात. मी आल्यामुळे तुमचा आवाज आता मुंबई नाही तर दिल्लीत मोदी व फडणवीस यांच्यापर्यंत गेला. ही लढाई केवळ आरक्षणासाठी नसून रोजगार, शिक्षण व स्वाभिमानासाठी आहे. आजच्या मेळाव्याची उपस्थिती पाहिली तर सरकारला दखल घेणे भाग आहे. हाच मेळावा जर मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाला असता तर सरकारने लगेच आरक्षण दिले असते. सत्ता मिळविण्यासाठी खोटे बोलून लोकांना फसविण्याचा उद्योग भाजपने आतापर्यंत केला आहे, पण आता हे सरकार आपल्याला उखडून टाकायचे आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पिवळा ध्वज फड़कवून सुरवात करण्यात आली. मान्यवरांनी व्यासपीठावर न बसता स्टेजच्या खाली बसून सरकारचा निषेध केला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या समाजाच्या लोकांनी गजीनृत्य करत ठेका धरला. मल्हार – मल्हार या आरक्षणाच्या गाण्याने उपस्थित लोकांनी उभे राहून नाचत मनसोक्त आनंद लूटला. स्टेजवर सर्व बहुजन समाजातील मंडळी व त्यांचे फ़ोटो लावण्यात आले होते.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, यापुढे धनगर समाज भाजपसोबत जाणार नाही.त्यांनी समाजाला बिरोबाची शपथ दिली जोपर्यंत आरक्षणाचं सर्टिफिकेट घेत नाही तोपर्यंत भाजपबरोबर जायचं नाही

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम 

दोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर 930 मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोईंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे.

विमानतळ परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणासाठी केंद्र सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाने 284 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातील संरक्षक भिंत आणि विद्युतीकरणाचे सुमारे 20 कोटींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विस्तारीकरणाच्या दुस-या टप्प्यातील धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले.

सध्याची 1370 मीटरची आहे. विस्तारीकरणानंतर त्यामध्ये 930 मीटरची भर पडणार आहे. हरियाणाच्या एनएस कन्स्ट्रक्‍शन हे धावपट्टीचे काम करणारे असून त्यांना हे काम 18 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. धावपट्टी वाढल्यानंतर एटीआर, बोईंगसारखी मोठी विमाने याठिकाणी उतरता येणार आहेत.

उड्डाण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-बंगलोर ही एअर अलायन्सची विमान सेवा 15 नोव्हेंबर, तर कोल्हापूर-तिरूपती ही इंडिगो कंपनीची विमान सेवा 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उड्डाण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-गोवा विमान सेवा सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे.

आकुर्डीत झळकली आक्षेपार्ह फलक

पिंपरी – शहरातील आकुर्डी परिसरात स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्‍टोबर’, अशी पोस्टर्स अज्ञाताने लावली आहेत. वीजेच्या खांबांवर अशी पोस्टर्स लावण्यात आली आहे. ही पोस्टर्स लावण्यामागे नेमका काय हेतू आहे? हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

“स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्‍टोबर’, अशी पोस्टर्स कोणी लावलीत तसेच पोस्टर्स लावण्यामागे नेमका काय उद्देश आहे, हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी एक पथकही नेमले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपळे सौदागर परिसरात “आयएम सॉरी शिवडे’ अशी पोस्टर्स झळकली होती. एका तरुणाने प्रेयसीची माफी मागण्यासाठी शेकडो पोस्टर्स लावल्याने एकच खळबळ डाली होती. त्यानंतर आकुर्डी परिसरात असाच एक प्रकार घडला आहे. दरम्यान, 15 ऑक्‍टोबरपासून एखाद्या मॉलमध्ये मेगा सेल सुरु होणार असल्याने ही जाहिरात करण्यात आली असावी, असा नागरिकांनी अंदाज वर्तविला आहे.

कल्याणमध्ये रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई- कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसांला फरफटत नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, आशा गावंडे असे महिला वाहतूक पोलिसाचे नाव आहे. रिक्षाचालक नागेश अलवागिरी याच्याकडे त्यांनी परवान्याची मागणी केली. मात्र, रिक्षाचालकांने रिक्षा थांबवली नाही आणि आशा गावंडे यांना फरफटत नेले. यात आशा गावंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी एमएफसी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

जयसिंगपुरात राजू शेट्टींची २७ ऑक्टोबरला ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १७ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २७ ऑक्टोबर रोजी घेण्यात येेणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते उदगाव (ता. शिरोळ) येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. दुधाचे थकीत अनुदान त्वरीत जमा न केल्यास राज्यातील मंत्र्यांना कपडे फाटेपर्यंत झोडपून काढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

खा. शेट्टी म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. केवळ थापा मारून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू केला आहे. मोदी सरकारने जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला आहे. उसाची एफआरपी २०० रूपये वाढवली म्हणून सरकारने जाहिरातबाजी सुरू केली आहे. वास्तविक ही शेतकर्‍यांची दिशाभूल आहे. एफआरपीचा रिकव्हरी बेस ९.३०टक्के होता, तो आता १० टक्के केला आहे. त्यामुळे अर्धा टक्का रिकव्हरी बेस वाढविल्यामुळे शेतकर्‍यांचा टनामागे १४५ रूपयांचा तोटा झाला आहे. एफआरपीमध्ये केवळ ५५ रूपयांची वाढ झाली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना यामुळे १३५०० कोटी रूपयांचा तोटा झाला असून मोदी सरकारचा हा निर्णय शेतकर्‍यांना मातीत घालणारा आहे. याविरूध्द मी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. यासाठी उद्याच दिल्लीला जात असूून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची बैठकही दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीत चर्चा करून मोदी सरकारच्या या निर्णयाविरूध्द देशातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्यावतीने मी याचिका दाखल करणार आहे.

राज्यातील मंत्री भामटे आहेत. केवळ बढाया मारण्यातच पटाईत आहेत. शेतकर्‍यांनी किती सहन करायचं? मी नेहमीच शेतकरी आणि शोषितांचे प्रश्न मांडत आलो आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांना हे सरकार न्याय देऊ शकत नाहीत. म्हणूनच माझी जात काढली जाते. ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी राज्याची तिजोरी खाली करू, असे म्हणणार्‍या मंत्र्यांनी लोकांची दिशाभूल बंद करावी.

पेट्रोल, डिझेलचा भडका, ९० रुपये पार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि विनिमय दरामुळे पेट्रोल व डिझेलचा दरांत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात पेट्रोलचा दर तब्बल दहा रुपये तर डिझेलचा नऊ रुपयांनी वाढला. सांगलीत सोमवारी पेट्रोलचा दर ९० रुपये ५ पैसे, डिझेल ७७ रुपये ३३ पैसे इतका होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशांचे बजेट कोलमडले असल्याने सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या बॅरेलचा दर सध्या वाढला आहे. वाढत्या कच्च्या तेलाचे दर आणि विनिमय दर बदलामुळे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील विविध करांचा परिणामही यावर झाला आहे. मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) १४ रुपये ७२ पैसे (२५ टक्के), अधिभार नऊ रुपये, २३ पैसे परवाना शुल्क तसेच विक्रेता मार्जिन आकारले जातात. याचबरोबर डिझेलसाठी १२ रुपये व्हॅट, एक रुपया अधिभार आणि विक्रेता मार्जिन दोन रुपये आहे. दरम्यान १ मार्चला पेट्रोलचा दर ७९ रुपये ५२ पैसे, डिझेल ६५ रुपये ४३ पैसे असा होता. तो आज पेट्रोलचा दर ९० रुपये ५ पैसे, डिझेल ७७ रुपये ३३ पैसे इतका झाला आहे.

इंधन दरवाढीविरोधात मागील महिन्याभरापासून देशात आंदोलने केली जात आहेत. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी बंद पुकारुन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. तसेच इंधनाचा समावेश जीएसटीमध्ये करण्याची मागणी केली, परंतू त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. इंधन दरवाढीचा फटका फळे आणि भाजीपाला विके्रत्यांनाही बसला. ऐन सणासुदीच्या कालावधीत नियमित वापरातील भाजीपाला, फळे, अन्नधान्यांच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्यांचे खिशाचे बजेट कोलमडले. शंभरीकडे वाटचाल करणार्‍या पेट्रोलच्या दर तातडीने कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर…

इंधनाच्या दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही परिणाम झाला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर पेट्रोलच्या शतकासाठी दहा धावा कमी असल्याने शतक होणार की नाही? अशी टीका सोशल मिडियासह सर्व स्तरांतून होत आहे. परंतू इंधनाच्या दराबाबत कोणतेही पाऊल उचलण्यास सरकार तयार नसल्याने सर्वसामान्यांतून नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.