पेट्रोल, डिझेलचा भडका, ९० रुपये पार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि विनिमय दरामुळे पेट्रोल व डिझेलचा दरांत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात पेट्रोलचा दर तब्बल दहा रुपये तर डिझेलचा नऊ रुपयांनी वाढला. सांगलीत सोमवारी पेट्रोलचा दर ९० रुपये ५ पैसे, डिझेल ७७ रुपये ३३ पैसे इतका होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशांचे बजेट कोलमडले असल्याने सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या बॅरेलचा दर सध्या वाढला आहे. वाढत्या कच्च्या तेलाचे दर आणि विनिमय दर बदलामुळे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील विविध करांचा परिणामही यावर झाला आहे. मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) १४ रुपये ७२ पैसे (२५ टक्के), अधिभार नऊ रुपये, २३ पैसे परवाना शुल्क तसेच विक्रेता मार्जिन आकारले जातात. याचबरोबर डिझेलसाठी १२ रुपये व्हॅट, एक रुपया अधिभार आणि विक्रेता मार्जिन दोन रुपये आहे. दरम्यान १ मार्चला पेट्रोलचा दर ७९ रुपये ५२ पैसे, डिझेल ६५ रुपये ४३ पैसे असा होता. तो आज पेट्रोलचा दर ९० रुपये ५ पैसे, डिझेल ७७ रुपये ३३ पैसे इतका झाला आहे.

इंधन दरवाढीविरोधात मागील महिन्याभरापासून देशात आंदोलने केली जात आहेत. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी बंद पुकारुन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. तसेच इंधनाचा समावेश जीएसटीमध्ये करण्याची मागणी केली, परंतू त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. इंधन दरवाढीचा फटका फळे आणि भाजीपाला विके्रत्यांनाही बसला. ऐन सणासुदीच्या कालावधीत नियमित वापरातील भाजीपाला, फळे, अन्नधान्यांच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्यांचे खिशाचे बजेट कोलमडले. शंभरीकडे वाटचाल करणार्‍या पेट्रोलच्या दर तातडीने कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर…

इंधनाच्या दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही परिणाम झाला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर पेट्रोलच्या शतकासाठी दहा धावा कमी असल्याने शतक होणार की नाही? अशी टीका सोशल मिडियासह सर्व स्तरांतून होत आहे. परंतू इंधनाच्या दराबाबत कोणतेही पाऊल उचलण्यास सरकार तयार नसल्याने सर्वसामान्यांतून नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.