कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम 

दोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर 930 मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोईंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे.

विमानतळ परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणासाठी केंद्र सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाने 284 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातील संरक्षक भिंत आणि विद्युतीकरणाचे सुमारे 20 कोटींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विस्तारीकरणाच्या दुस-या टप्प्यातील धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले.

सध्याची 1370 मीटरची आहे. विस्तारीकरणानंतर त्यामध्ये 930 मीटरची भर पडणार आहे. हरियाणाच्या एनएस कन्स्ट्रक्‍शन हे धावपट्टीचे काम करणारे असून त्यांना हे काम 18 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. धावपट्टी वाढल्यानंतर एटीआर, बोईंगसारखी मोठी विमाने याठिकाणी उतरता येणार आहेत.

उड्डाण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-बंगलोर ही एअर अलायन्सची विमान सेवा 15 नोव्हेंबर, तर कोल्हापूर-तिरूपती ही इंडिगो कंपनीची विमान सेवा 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उड्डाण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-गोवा विमान सेवा सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे.