बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात; जयदेव ठाकरेंची याचिका मागे

बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचे त्यांनी हायकोर्टात सांगितले. याचिका मागे घेतल्याने ठाकरे बंधूंमध्ये बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन सुरु असलेला वाद संपुष्टात आल्याचे दिसते.

वाद नेमका काय होता?

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली होती. ‘बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव याच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचेही त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे २०११ मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते’, असे त्यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितले होते.

दिवाळी गिफ्ट! उद्योगांना ५९ मिनिटात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज

छोटया आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी ५९ मिनिटात १ कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदींनी एमएसएमई सपोर्ट कार्यक्रम लाँच केला. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आपल्या सरकारने १२ धोरणांना मंजुरी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हे दिवाळी गिफ्ट असून यामुळे स्क्षूम, छोटया आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसायांना सहजतेने कर्ज उपलब्ध होईल. ज्यामुळे रोजगार वाढेल असे मोदी म्हणाले

छोटया उद्योगांसाठी १२ ऐतिहासिक निर्णय घेतले असून हे दिवाळी गिफ्ट आहे. त्यात ५९ मिनिटात १ कोटीपर्यंत कर्ज हा महत्वाचा निर्णय आहे असे मोदी म्हणाले. जीएसटी नोंदणीकृत एमएसएमई उद्योगांना कर्जामध्ये २ टक्के सवलत मिळेल. एमएसएमई सेक्टरमुळे भारत आर्थिक दृष्टया बळकट झाला आहे असे मोदी म्हणाले.

देशातील १०० जिल्ह्यात पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम चालणार आहे असे मोदी म्हणाले. देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमई सेक्टरचे ३० टक्के योगदान आहे. या सेक्टरचे देशभरात विशाल जाळे पसरले असून ६.३ कोटीपेक्षा जास्त एमएसएमई युनिट देशात कार्यरत असून ११.१ कोटी लोकांना यातून रोजगार मिळतो असे मोदींनी सांगितले.