डी.वाय.पाटीलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेसला धक्का

कोल्हापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

डी. वाय. पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं नाव आहे. कोल्हापुरातल्या राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. तर, सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. परिणामी सतेज पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

जालना : बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्तीविश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.

अभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.

पुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.

मराठा आरक्षणाची बाजू भक्कम,विनामूल्य करणार युक्तीवाद

मराठा आरक्षणाची बाजू भक्कम,विनामूल्य करणार युक्तीवाद

मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीवरून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याने आरक्षणाची बाजू भक्‍कम बनली आहे. जानेवारी महिन्यापासून मराठा आरक्षणावर युक्‍तिवाद करण्यासाठी आपण स्वत: मुंबई उच्च न्यायालयात उभे राहू, असे ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी सांगितले.

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महाराष्ट्राच्या हिताचे असून, त्यासाठी ही केस आपण विनामूल्य लढवू, असे सांगत त्यांनी कोणताही मोबदला स्वीकारण्यास नकार दिला.
मराठा आरक्षणासंबंधी विधिमंडळात विधेयक मंजूर झाल्याने हे आरक्षण आता लागू झाले आहे. मात्र, या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने आरक्षणावर कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. आरक्षणाची बाजू भक्‍कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने हरिश साळवेयांना ही केस लढण्याची विनंती केली होती. त्यासाठी साळवे हे बुधवारी मुंबईत आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हरिश साळवे यांनी बुधवारी चर्चा केली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या विविध कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. साळवे यांनी आरक्षणाबाबत 1960 पासून विविध राज्यांतील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांच्या प्रतीही सोबत आणल्या होत्या. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकेल, असा ठाम विश्‍वास त्यांनी या बैठकीत व्यक्‍त केला. मराठा समाजाची राज्यातील परिस्थिती पाहता, आरक्षण देणे ही काळाची गरज आहे. आपण ही केस लढविताना कोणताही मोबदला घेणार नाही. आपण राज्याच्या हितासाठी कर्तव्य भावनेतून ही केस स्वीकारली असल्याचे साळवे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

नवमहाराष्ट्र न्यूज लवकरचं यु-ट्युब वर सुरू होत आहे,दर्जेदार बातम्यांसाठी सबस्क्राईब करा.

नवमहाराष्ट्र न्यूज लवकरचं यु-ट्युब वर सुरू होत आहे,दर्जेदार बातम्यांसाठी सबस्क्राईब करा.

भाजपचा शेवटचा प्रवास सुरु झाला – छगन भुजबळ

देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजपचा शेवटचा प्रवास सुरू झाला असून आम्हाला अच्छे दिन नको तर हमारे दिन हवे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.

छगन भुजबळ हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुका भाजपने विकास या शब्दाला घेऊन लढवल्या आणि जिंकल्या. मात्र साडे चार वर्षात विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे जनतेने भाजपला पाच राज्यात नाकारले आहे.

भाजपला २०१९ च्या निवडणुकीत देखील याच परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले तर हनुमनाची जात कुठली हे सुद्धा ते सांगायला लागले अशा शब्दात भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाण साधला. गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीतून अनेकजण भाजप मध्ये गेले आता पुन्हा ते घरवापसी करतील का या प्रश्नावर ते म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांनी परत यायला हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी नवमहाराष्ट्रचे मोबाईल अँप डाऊनलोड करा.

मराठा जात प्रमाणपत्र, पडताळणीचे आदेश

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्यात आले असून स्वतंत्र सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जात प्रमाणपत्र व जात पडताळणीचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले. यापूर्वी 2014 मध्ये मराठा समाजाला देण्यात आलेली जात प्रमाणपत्रेही या आरक्षणाला पात्र ठरणार आहेत.

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजाच्या व्यक्तीला जातीचा दाखला काढावा लागेल व जातपडताळणी समितीकडून त्याची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच एसईबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे.

मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आरक्षणाचा लाभ कसा मिळणार, त्यासाठी जात पडताळणी करून घेणे आदींबाबत संभ्रम होता. त्यामळे हा आदेश जारी करून स्पष्टता आणण्यात आली आहे. मराठा समाजालाही इतर प्रवर्गाप्रमाणेच व प्रक्रियेप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळणार आहे. 30 नोव्हेंबर पूर्वीचे पुरावे जोडून विहित नमुना अर्जासोबत जोडून ते तहसीलदार यांच्याकडे द्यावे लागतील. राज्य सरकारने अर्जाचा नमुना देखील जाहीर केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र नमुना’ असे या अर्जावर स्पष्ट शब्दात लिहिले आहे. दस्ताऐवजासह अर्ज सादर केल्यानंतर तहसीलदार हा अर्ज उपविभागीय अधिकारी अथवा उपजिल्हाधिकार्‍याकडे पाठवून जातीचे प्रमाणपत्र देण्याची विनंती करतील.
तहसिलदारांकडे जातीच्या दाखल्यासाठी अर्जदाराने जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतमधील गाव नमुना नंबर 14 मधील नोंदणी अथवा नगरपंचायत, महापालिकांमधील जन्म-मृत्यूच्या दाखल्यातील नोंदीची कागदपत्रे द्यावी लागतील. तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्या जात वैधता पडताळणी समितीच्या अंतिम सही व शिक्क्यासह जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या आरक्षणाचा लाभ मिळेल.