भाजपचा शेवटचा प्रवास सुरु झाला – छगन भुजबळ

देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजपचा शेवटचा प्रवास सुरू झाला असून आम्हाला अच्छे दिन नको तर हमारे दिन हवे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.

छगन भुजबळ हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुका भाजपने विकास या शब्दाला घेऊन लढवल्या आणि जिंकल्या. मात्र साडे चार वर्षात विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे जनतेने भाजपला पाच राज्यात नाकारले आहे.

भाजपला २०१९ च्या निवडणुकीत देखील याच परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले तर हनुमनाची जात कुठली हे सुद्धा ते सांगायला लागले अशा शब्दात भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाण साधला. गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीतून अनेकजण भाजप मध्ये गेले आता पुन्हा ते घरवापसी करतील का या प्रश्नावर ते म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांनी परत यायला हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी नवमहाराष्ट्रचे मोबाईल अँप डाऊनलोड करा.