सावित्रीबाईंमुळेच महिलांची प्रगती… आ. ॲड. गौतम चाबुकस्वार

पिंपरीत महिलांना रिक्षांचे वितरण
पिंपरी /पुणे – सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी देशात प्रथम पुण्यात शाळा सुरु केली. त्‍यामुळे महिला ज्ञानगंगोत्रीच्या मुख्य प्रवाहात आल्या. सावित्रीबाई झाल्या नसत्‍या तर महिला पंतप्रधान, जेटफायटर विमान महिला चालवू शकल्‍या नसत्‍या. सावित्रीबाईंच्या धाडसी निर्णयामुळेच महिला प्रगती करत आहेत. आपल्‍या देशात पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना रिक्षांचे वितरण होत असून हा दिवस महिलांसाठी ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी केले.
कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि टीव्हीएस मोटार कंपनी यांच्या संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांना रिक्षा वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 3) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातील मैदानावर संपन्न झाला. यावेळी संयोजिका घरकाम महिला संघटनेच्या अध्यक्षा आशा कांबळे,कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, राष्ट्रपती पदक विजेत्या पहिल्या महिला रिक्षा चालक शीला डावरे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक राहुल कलाटे, उपपरिवहन अधिकारी आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर, टीव्हीएस मोटार कंपनीचे जनरल मॅनेजर एस.एस. कृष्णकुमार, शिवानंद लामदाडे, सार्थक ऑटोचे संचालक सुनील बर्गे, आरोग्य सेनेचे अभिजीत वैद्य, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी ठकसेन पोरे, बापू भावे, अनिल शिंदे, प्रल्हाद कांबळे, सुग्रीव शिंदे, नाना जावळे, कल्‍याण पोवळे, प्रभाकर निकम, सुनील पाटील, फिरोज मुल्‍ला, राजन बुटले, गजानन बाबर, संजय चव्हाण, प्रकाश जाधव, मुन्ना नदाफ, राजेंद्र सोनी, मारुती कोंडे, सुनील बोर्डे, राहुल कांबळे, शिवाजी गोरे, गफार नदाफ, अहमद बाबा, चंद्रकांत गोडबोले, बशिर सय्यद, बाबुभाई शेख, मल्‍लीकार्जुन स्वामी आदी उपस्थित होते. यावेळी ‘रिक्षावाला मंच’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रुपाली तिकोने यांना प्रातिनिधीक स्वरूपात रिक्षाची चावी प्रदान करण्यात आली.
चाबुकस्वार म्‍हणाले की, घरकाम करणा-या कष्टकरी महिलांना रोजगाराची नवी संधी प्राप्त झाली आहे. टीव्हीएस कंपनीने संगणक भेट दिला आहे. त्‍यामुळे त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत मिळणार आहे. रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न असून 25-30 वर्ष वाहन चालविल्यानंतर शारीरिक क्षमता कमी होते. याचा विचार करता रिक्षा चालकांसाठी कल्‍याणकारी मंडळ स्थापन करून योजना सुरु कराव्यात. याबाबत शासनस्तरावर मदत करण्यासाठी आपला सदैव पाठिंबा व सहकार्य राहील, असे चाबुकस्वार यांनी सांगितले.
आनंद पाटील म्हणाले, महिलांनी जिद्दीने रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्‍यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महिला रिक्षा चालकांच्या वाहनांना परिवहन कार्यालयाकडून दोन वर्षाचे फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येईल. तसेच त्यांच्या काही समस्या, अडचणी असल्‍यास संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
अभिजीत वैद्य मार्गदर्शन करताना म्‍हणाले, पिंपरी चिंचवड शहरात नवा इतिहास लिहीला गेला आहे. सध्याचा काळ तंत्रज्ञानाचा असून महिलांच्या हातात तंत्रज्ञानाची ज्योत दिली आहे. रिक्षा चालक हा असंघटीत कष्टकरी असून वृध्द झाल्‍यावर आपण कसे जगायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. याचा विचार करता देशव्यापी महामंडळ स्थापन करून रिक्षा चालकांना निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे. सरकारने कष्टक-यांच्या या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा वैद्य यांनी व्यक्‍त केली.
बाबा कांबळे म्‍हणाले की, कष्टकरी कामगार, बांधकाम कामगार, रिक्षा चालक यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याव्दारे सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. देशात दोन कोटी रिक्षा चालक असून त्यांना पेन्शन योजना सुरु करावी अशी मागणी सरकारकडे केली असून त्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. रिक्षांसाठी परमिट आणि नवीन कंपन्या रिक्षा निर्मितीक्षेत्रात उतरल्‍यामुळे स्पर्धा सुरु झाली असून रिक्षा चालक-मालकांसाठी फायदेशीर आहे.
यावेळी एकनाथ पवार, गफार नदाफ, राजेंद्र सोनी यांनी ही मनोगत व्यक्‍त केले. सुत्रसंचालन शुभांगी शिंदे, प्रास्ताविक आशा कांबळे, आभार आनंद तांबे यांनी मानले.