विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे प्रदीर्घ आजाराने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे आज (दि.१५) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

१ सप्टेंबर १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० साली ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते तसेच पक्षात त्यांनी महत्वाची पदेही भुषवली होती. एक संयमी नेता आणि चांगला मार्गदर्शक अशी त्यांची ख्याती होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे त्यांचे पुत्र होत. दरम्यान, २००९ पासून ते शिराला तालुक्यातील कोकरुड येथे राहत होते.