मंत्रालयाच्या दारातचं महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नवमहाराष्ट्र वेब टीम

मुंबई : मंत्रालयात यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आत्महत्येचा प्रयत्न झाला. मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

राधाबाई साळुंखे असे संबंधित महिलेचे नाव असून, त्या मूळच्या बीडच्या आहेत. मात्र, राधाबाई या चेंबूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) जवान यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी राधाबाई साळुंखे यांच्या हातून रॉकेलची बाटली काढून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करता आली नसल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राधाबाई यांनी ज्या सावकाराकडून कर्ज घेतले होते, त्या सावकाराकडून पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत.

‘मी सुद्धा राजपूत! एकालाही सोडणार नाही’; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर

नवमहाराष्ट्र वेब टीम

पुढील आठवड्यात प्रदर्शित होणारा कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या चित्रपटावरून करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप कंगनानं केला आहे. जर करणी सेनेनं मला धमक्या देणं थांबवलं नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावं अशा इशारा कंगनानं दिला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसेवेच्या माहितीनुसार करणी सेनेच्या महाराष्ट्र विभागानं या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवलं आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली असतील तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असंही या पत्रात म्हटलं होतं.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यापूर्वी करणी सेनेनं संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं केली होती.

डान्सबार बंदीसाठी अध्यादेश आणू : सुधीर मुनगंटीवार

नवमहाराष्ट्र वेब टीम

चंद्रपूर : डान्सबारसाठीच्या जाचक अटी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारने केलल्या कायद्यातील अनेक अटींचा आता उपयोग होणार नाही. टीकेची झोड उठताच सरकार ‘डॅमेज कंट्रोल’च्या प्रयत्नात लागलं आहे. डान्सबार बंदीसाठी सरकार अध्यादेश आणेन, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या अभ्यास करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. विधीमंडळात डान्सबार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली आहे. यात कोणतंही पक्षीय राजकारण नव्हतं. कायद्यात कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे हे तपासले जाणार आहे. विधी आणि न्याय विभागाचे मत घेतले जाईल. गरज पडल्यास अध्यादेश काढू, मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी सांगितली.

राज्य सरकारने डान्सबार सुरु करण्यासाठी जाचक अटी घातल्या होत्या. याविरोधात बारमालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण राज्य सरकारने कमकुवत बाजू मांडल्याने निकाल सरकारच्या विरोधात लागला, असा आरोप विरोधकांनी केलाय.

कोर्टाने डान्सबारवर घालण्यात आलेली बंदी यापूर्वीच हटवली होती. पण नव्याने परवान्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी घातल्या होत्या. नव्या कायद्यानुसार, बार फक्त संध्याकाळी 6.30 ते रात्री 11.30 या वेळेतच खुले ठेवता येतील. शिवाय जिथे मुली डान्स करतील तिथे दारु पिता येणार नाही, असाही नियम बनवण्यात आला होता.

राज्य सरकारच्या या नियमांमुळे बार मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यानंतर संघटनेने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

कांद्‍याच्या ढीगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या

नवमहाराष्ट्र वेब टीम

मालेगाव – कांद्‍याचे भाव पडल्‍याने उत्‍पादन खर्च ही निघणार नसल्‍याच्या कारणातुन निराश होउन एका शेतकर्‍याने आत्‍महत्‍या केली. कंधाणे शिवारात शुक्रवारी पहाटे हि घटना घडली. ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (वय 25) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

त्यांच्याकडे 41 गुंठे शेती असून, आईवडीलांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्‍यामध्ये शिवणकर यांनी एकरभर कांदा पीक घेतले होते. पंधरा दिवसांपुर्वीच कांद्‍याची काढणी केली होती. परंतु बाजारभाव नसल्याने शेतातच माल पडून होता. भाव वधारण्याची चिन्हे नसल्‍याने ते चिंतेत होते. त्यातच कांद्याला कोंब फुटू लागल्‍याने, उत्पादन खर्च ही वसूल होण्याची शाश्वती राहिली नसल्याच्या कारणातुन विषण्ण अवस्थेत ज्ञानेश्वर याने विष पिऊन जीवनयात्रा संपविली. तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक के के पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ज्ञानेश्वर यांचे ७० हजार रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्ञानेश्वर यांच्यामागे आईवडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.