मंत्रालयाच्या दारातचं महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नवमहाराष्ट्र वेब टीम

मुंबई : मंत्रालयात यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आत्महत्येचा प्रयत्न झाला. मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

राधाबाई साळुंखे असे संबंधित महिलेचे नाव असून, त्या मूळच्या बीडच्या आहेत. मात्र, राधाबाई या चेंबूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) जवान यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी राधाबाई साळुंखे यांच्या हातून रॉकेलची बाटली काढून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करता आली नसल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राधाबाई यांनी ज्या सावकाराकडून कर्ज घेतले होते, त्या सावकाराकडून पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत.