‘मी सुद्धा राजपूत! एकालाही सोडणार नाही’; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर

नवमहाराष्ट्र वेब टीम

पुढील आठवड्यात प्रदर्शित होणारा कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या चित्रपटावरून करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप कंगनानं केला आहे. जर करणी सेनेनं मला धमक्या देणं थांबवलं नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावं अशा इशारा कंगनानं दिला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसेवेच्या माहितीनुसार करणी सेनेच्या महाराष्ट्र विभागानं या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवलं आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली असतील तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असंही या पत्रात म्हटलं होतं.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यापूर्वी करणी सेनेनं संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं केली होती.