पंतप्रधान मोदींनी घेतली आपल्या आईची भेट

नवमहाराष्ट्र वेब टीम

गांधीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील तीन दिवसांपासून गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरात सरकारच्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या कार्यक्रमासाठी मागील तीन दिवसांपासून गांधीनगरमध्ये असणाऱ्या मोदींनी आज सकाळी आपल्या आईची भेट घेतली. अगदी मोजक्या सुरक्षारक्षकांसोबत ते गुजरातमधील आपल्या घरी पोहचले. सकाळी नऊ वाजता त्यांनी हिराबेन यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांआधी आपल्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी मोदींनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी नऊच्या सुमारास गंधीनगर येथील घरी पोहचले आणि साडे नऊ वाजता ते अहमदाबाद विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. सामान्यपणे मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आवर्जून आपल्या आईला भेटतात. मात्र त्यावेळी त्यांची धावती भेट अवघ्या १५ मिनिटांची असते. यावेळेस त्यांनी आपल्या दौऱ्यामधून वेळात वेळ काढून आपल्या आईची भेट घेत अधिक काळ आपल्या आईबरोबर घालवला. हिराबेन यांची प्रकृती मागील काही काळापासून ठिक नसल्याने मोदींनी आईची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावरून हझीराकडे रवाना झाले. हझीरा येथील एल अँड टीच्या आर्मर्ड सिस्टम कॉम्प्लेक्समध्ये रणगाड्यांची चाचण्यांची पहाणी केली. मोदी ‘के-९ वज्र- टी’ ही तोफ लष्कराच्या स्वाधीन करणार आहेत. तसेच दीव-दमणमधील १७०० कोटी रुपयांच्या योजनांचेही ते उद्घाटन करणार आहेत.

युवकाची उकळत्या काहीलीत उडी मारून आत्महत्या

नवमहाराष्ट्र वेब टीम | कोल्हापूर

पालकरवाडी (ता. राधानगरी) येथील गुर्‍हाळघरातील उकळत्या रसाच्या काहिलीत उडी मारल्याने 95 टक्के होरपळलेल्या गौतम मल्‍लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, करवीर) याचा मृत्यू झाला.

गौतम हा तीन महिन्यांपासून राधानगरीतील कसबा वाळवेत सचिन पाटील यांच्या गुर्‍हाळघरात जळण टाकण्याचे काम करीत होता. शुक्रवारी सकाळी तो काहिलीजवळ आला. सहकार्‍यांच्या डोळ्यादेखतच त्याने उकळत्या रसाच्या काहिलीत उडी मारली. हा प्रकार पाहताच सहकार्‍यांनी आरडाओरड करून काठ्या, दोरीच्या सहाय्याने त्याला काहिलीतून बाहेर काढले. यामध्ये तो संपूर्णपणे पोळला होता. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. तो बेशुद्ध होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून तो निराश होता.

सीसीटीव्हीत प्रकार कैद

गौतम कांबळे हा चालत काहिलीपर्यंत आला. उकळत्या रसात त्याने स्वत:हून उडी घेतल्याचे चित्रीकरण येथील सीसीटीव्हीमध्ये झाले.