लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी 48 तासात राजकीय पक्षांना जाहिराती करता येणार नाहीत

प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी दोन दिवस आधी राजकीय पक्षांना जाहिराती करता येणार नाहीत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी 48 तासात कोणत्याही राजकीय पक्षाला प्रिंट तसेच डिजिटल माध्यमाद्वारे जाहिरात करता येणार नाही. लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 126 मध्ये या अनुषंगाने दुरुस्ती करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे केली असल्याचे समजते. मतदानाआधी 48 तासात केल्या जाणार्‍या जाहिरातीद्वारे मतदारांवर प्रभाव टाकला जाऊ शकतो, त्यामुळेच अशा जाहिरातींवर प्रतिबंध घातला जावा, असे निवडणूक आयोगाचे मत आहे.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व राज्यांनी अधिकार्‍यांच्या बदल्याबाबत दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आदेश अलीकडेच निवडणूक आयोगाने दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील सर्व तयारी राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांना येत्या 28 तारखेपर्यंत करावी लागणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार 28 फेब्रुवारीनंतर कोणत्याही अधिकार्‍याची बदली होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्चच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक टप्प्यात निवडणूका घेण्याचे आयोगाचे नियोजन आहे.