राजकारणातील प्रस्‍थापितांना मोडीत काढणार : गोपीचंद पडळकर

गोपीचंदपडळकर_936a062a-18ae-4fbd-a7ee-211a3c270faf-c1051c9c-89c6-4c91-982a-6ad90ee22749_cmprsd_40

मोहोळ : वार्ताहर

गेल्या सत्तर वर्षात राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेने आमचा अपमान केला आहे. त्यामुळे या व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला असून, लाखो लोक यामध्ये सामिल होत आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात धग आहे. ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे किंवा महाराजांच्या विरोधात नसून, ही निवडणूक विचारांची आहे. विचारांची निवडणूक विचारांनी जिंकायची आहे असे प्रतिपादन वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मोहोळ येथे केले.

गुरुवारी ११ एप्रिल रोजी मोहोळ येथील बाजार समितीच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, युवकाध्यक्ष अमित भुईगळ, जेष्ठ नेते पोपट सोनवणे, श्रीशैल गायकवाड, विठ्ठल पाथरुट, तालुकाध्यक्ष राजेंद्र आवारे, आकाश सरवदे, प्रकाश सोनटक्के, अॅड. दत्तात्रय कापूरे, अॅड. सुनिल प्रक्षाळे, तुकाराम पारसे, महिला अध्यक्षा सखुबाई क्षीरसागर, एमआयएमचे बिलाल शेख, अॅड. इरफान पाटील, अॅड. विनोद कांबळे, डी.डी एकमल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांनी गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन समाजाला अनेक आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. आता त्यांच्या ढोंगी पुरोगामित्वाचा बुरखा वंचित बहुजन आघाडीने फाडला आहे. त्यामुळेच या आघाडीत सर्व जाती धर्माचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. सत्ताधारी पार्टीत पुढारी स्टेजवर आहेत आणि खाली मात्र कोणीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

येणाऱ्या काळात राज्यात फार मोठा बदल होणार असून २०१९ चे विधानसभेचे सत्ताकारण हे वंचित बहुजन आघाडीला विचारात घेतल्या शिवाय होणार नाही. यावेळी त्यांनी अॅड प्रकाश आंबेडकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे अवाहन केले. सभा संपल्यानंतर पडळकर हे पुढील सभेसाठी हेलिकॉप्टरने मंगळवेढ्याच्या दिशेने रवाना झाले.या सभेसाठी मोहोळ शहर व तालुक्यातील शेकडो लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोहोळ पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.