तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या; सुषमा स्वराज यांचा ममतांवर निशाणा

images (12)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर आता  पंतप्रधानांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून ममता बॅनर्जी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना धारेवर धरले.

तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ममताजी तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यापुढेही तुम्हाला त्यांच्याशीच चर्चा करायची आहे, असे ट्विट करत स्वराज यांनी ममतांवर निशाणा साधला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या खालच्या दर्जाचे राजकारण करीत असून आपण फॅनी वादळाने राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचारपूस करण्यासाठी दूरध्वनी केला तेव्हा त्यांनी बोलण्याचे टाळले, त्यांनी वादळावरही राजकारण केले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेदरम्यान केली होती. दीदींना राजकारणात जास्त रस आहे. मी राज्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो संपर्कही राज्य सरकारने होऊ दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर त्याला उत्तर देत मोदी यांनी वादळग्रस्त ओदिशाचा दौरा केल्यानंतर आपल्याला कलाइकुंडा येथे भेटीसाठी बोलावले होते. मात्र ते बोलावतील तेथे जाण्यासाठी आम्ही त्यांचे नोकर आहोत का? निवडणुकीच्या काळात मी मुदत संपलेल्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर का जावे, असा प्रश्न ममतांनी विचारला होता. तसेच मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली होती. ममता बॅनर्जींच्या याच टीकेवर स्वराज यांनी ट्विटरवरून निशाणा साधला.