काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक यांचे निधन

IMG-20190511-WA0000इस्लामपूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत सायंकाळी पाचच्या सुमारास अधिकृत घोषणा केली. महाडिक यांच्या पश्‍चात पत्नी मिनाक्षीताई, मुले पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, मुलगी सांगली महापालिकेच्या नगरसेविका रोहिणी पाटील, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कनिष्ट बंधू तसेच खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांचे ते सख्खे चुलते होत.
आज दुपारी पेठनाका (ता. वाळवा) येथील निवासस्थानी त्यांना हृदयाविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने इस्लामपूर येथील सुश्रुषा हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले करण्यात आले. मात्र उपचार सुरु करण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. महाडिक यांच्या निधनाची माहिती समजताच तालुक्‍यातील सर्वपक्षीय राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात असलेल्या पेठ-सांगली रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. नानासाहेब महाडिक यांचे ज्यष्ठ चिरंजीव राहुल महाडिक कुटुंबासह कालच (शुक्रवारी) जर्मनीला गेले आहेत. आज सायंकाळी सहाच्या सुमारास ते जर्मनी येथे पोहचले. दरम्यान नानासाहेब महाडिक यांचा मृत्यु झाला. उद्या राहुल महाडिक सायंकाळी चार पर्यंत येलूर येथे पोहचतील. त्यानंतर सहा वाजता त्यांचे मुळ गाव येलूर येथे नानासाहेब महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

तत्पुर्वी दुपारी तीन वाजल्यापासून त्यांचा मृतदेह पेठ येथील सम्राट या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महाडिक यांच्या निधनाचे वृत्त समजताच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार महादेवराव महाडिक, सी. बी. पाटील, दि. बा. पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.