महापुरुषांच्या जयंती उत्सवास संभाजी महाराज व गोपीचंद पडळकर शिवाजीनगरला उपस्थित राहणार

कडेपूर :वार्ताहर
शिवाजीनगर ता. कडेगांव येथे मंगळवार, दि. २१ मे रोजी खासदार छत्रपती संभाजी महाराज व बहुजन नेते गोपीचंद पडळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवशक्ती सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मांडवे यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय स्थापित डॉ. आंबेडकर फौंडेशन व शिवशक्ती सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले आहे.
कार्यक्रमामध्ये कडेगांवचे पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस, अॅड. प्रमोद पाटील, अॅड. आर. एम. वजीर, वज्रधारी न्युजचे संपादक दत्तकुमार खंडागळे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परकीया चित्रपट फेम शुभम सातपुते व टीमचा देशभक्तीपर व महापुरुषांच्या जीवनगाथा गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज व गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.