‘एक देश, एक रेशन कार्ड’; देशात कुठेही मिळणार धान्य!

देशात सध्‍या ‘एक देश, एक निवडणूक’ ही चर्चा सर्वत्र सुरु असतानाच मोदी सरकारकडून नागरिकांना ‘एक देश, एक रेशन कार्ड’ या योजनेची तयारी सुरु केल्‍याची माहिती समोर आली आहे. याची माहिती केंद्रीय अन्‍न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे. सरकार याच दिशेने काम करत असल्‍याची माहिती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितली.

रेशन कार्डची पोर्टेबिलिटी करता येणार

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान म्‍हणाले की, देशभरात रेशन कार्डची पोर्टेबिलिटीच्‍या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना विशेष करुन प्रवशांना देशभरात कुठेही सार्वजनिक वितरण प्रणालीच्‍या माध्‍यमातून (PDS) रेशनधान्य मिळू शकेल.

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी गुरुवारी राज्‍यांच्‍या अन्न सचिवांची व सरकारी अधिकार्‍यांच्‍या बैठकीत ही माहिती दिली.

रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करा, अशी सूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकेल.

कशी असणार ही नवीन व्‍यवस्‍था

या नवीन व्‍यवस्‍थेनुसार आपणास देशभरात एकाच राशन कार्डचा वापर करता येणार आहे. तसेच बनावट रेशनकार्ड तयार करणार्‍यांच्‍यावरही लक्ष ठेवण्‍यात येणार आहे. आधार कार्डप्रमाणेच रेशन कार्डला एक विशिष्ट (यूनिक) ओळख नंबर दिला जाणार आहे. यामुळे बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. यासाठी एक ऑनलाइन एकीकृत (इंटेग्रेटेड) सिस्टीम बनवणार आहेत. यामध्‍ये रेशनकार्डचा डेटा (माहिती) साठवली जाणार आहे. यामुळे बनावट रेशनकार्ड तयार करण्‍याचा प्रयत्‍न केला तर या सिस्‍टीमच्‍या माध्‍यमातून समजू शकेल.

या नवीन सिस्‍टीममुळे एक मोठा फायदा असा होणार आहे की, लाभार्थी देशातील कोणत्‍याही ठिकाणी कोणत्‍याही रेशनच्‍या दुकानात अनुदानित धान्‍य घेऊ शकेल. ही ऑनलाईन व्‍यवस्‍था तयार झाल्‍यास, नोकरीनिमित्त दुसर्‍या राज्‍यात गेलेल्‍या लोकांना रेशन मिळण्‍याची सुविधा होणार आहे. याचा मोठ्‍या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे.

https://www.taboola.com/rend-demo?url=https%3A%2F%2Ffeed.taboola.com%2Ffeed-yourshttps://www.taboola.com/rend-demo?url=https%3A%2F%2Ffeed.taboola.com%2Ffeed-yours

अर्थमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प फोडला;धनंजय मुंडेंचा आरोप

विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एका बाजूला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडत असताना, त्याच्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार ग्राफीक्ससह प्रसिद्‌ध झाल्याने विधानपरिषदेत गोंधळ उडाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे सभापतींवर अर्थ संकल्पाचे वाचन करणाऱ्या अर्थ राज्य मंत्री केसरकर यांचे भाषण दहा मिनिटे थांबविण्याची नामुष्की आली.

या प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले,‘आज सभागृहात राज्याचे अर्थमंञी हे सभागृहात अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थसंकल्पाबाबत ट्विटरवर याबाबत प्रतिक्रीया येऊ लागल्या तसेच जाहिराती प्रकाशित होऊ लागल्या. याचाच अर्थ असा की, राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वीच तो फुटला. हा सभागृहाचा व सभागृतील सर्व सदस्यांचा अपमान आहे. इतिहासात यापूर्वी अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नाही. याशिवाय हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक आचारसंहितेपूर्वी लोकांना दाखविण्यात आलेले गाजर आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सभागृहातून वॉक आऊट केला.

सभापतींविरोधात अविश्वास

अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करून विरोधक आक्रमक झाले, त्यानंतर सर्व सभासदांना सभापतींच्या दालनात बोलविण्यात येऊन त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतरच अर्थ राज्यमंत्र्यांचे अर्थसंकल्प वाचन पुन्हा सुरू झाले. अर्थसंकल्प फुटल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी सदस्यांनी केली. दरम्यान अर्थसंकल्प मांडताना सभापतींनी अर्थ राज्य मंत्र्यांचे भाषण थांबवले. हे इतिहासात प्रथमच घडले आहे. त्यामुळे आम्ही सभापतींवर अविश्वास ठराव मांडत आहोत असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला.

दरम्यान अर्थसंकल्प फुटल्याच्या विरोधकांच्या आरोपावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे भाषण मध्येच थांबवून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. अर्थमंत्री फुटलेला नसून विरोधकांनी नव माध्यमे समजून घ्यायला हवी असा खुलासेवजा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक, १७ जूनला राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन.

नवमहाराष्ट्र न्यूज आँनलाईन

ईव्हीएम हटाओ, देश बजाओ असा नारा देत वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश कोअर कमिटीने १७ जूनला राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर हे घंटनाद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिली.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृध्द आहे. जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशिन नाकारली आहे. मात्र भारतातील तमाम वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्विकार केला आहे. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात म्हणजे खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ हे राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अशोक सोनोने यांनी केले आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी सकाळी (दि.१६) विस्तार झाल्यानंतर नव्याने १३ मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावून घेण्यात आले. तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर रविवारी रात्री या नव्या मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर झाले आहे. यामध्ये काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांकडे गृहनिर्माण खाते सोपवण्यात आले आहे. तर विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खाते काढून घेत त्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नव्या मंत्र्यांना मिळालेली खाती…

१) कॅबिनेट मंत्रीपदं

 • अॅड. आशिष शेलार (भाजपा) : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
 • राधाकृष्ण विखे-पाटील (भाजपा) : गृहनिर्माण
 • राम शिंदे (भाजपा) : पणन व वस्त्रोद्योग
 • डॉ. संजय कुटे (भाजपा) : कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
 • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) : रोजगार हमी व फलोत्पादन
 • डॉ. सुरेश खाडे (भाजपा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
 • प्रा. डॉ. तानाजी सावंत (शिवसेना) : जल संधारण
 • संभाजी पाटील-निलंगेकर (भाजपा) : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण
 • डॉ. अनिल बोंडे (भाजपा) : कृषी
 • डॉ. अशोक उईके (भाजपा) : आदिवासी विकास
 • जयकुमार रावळ (भाजपा) : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
 • सुभाष देशमुख (भाजपा) : सहकार, मदत व पुनर्वसन

२) राज्य मंत्रीपदं

 • अविनाथ महातेकर (रिपाइं) : समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
 • डॉ. परिणय फुके (भाजपा) : सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने
 • संजय भेगडे (भाजपा) : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
 • योगेश सागर (भाजपा) : नगरविकास
 • अतुल सावे (भाजपा) : उद्योग व खनीकर्म, अल्पसंख्यांक व वक्फ

राज्यातील सरकार आभासी आहे.संपूर्ण जनतेला केवळ आभास दाखवून त्यांची फसवणूक करत आहे

मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील सरकार आभासी आहे. देशातील संपूर्ण जनतेला केवळ आभास दाखवून त्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका विरोधकांनी केली.

राज्यातील भाजप सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर करेल, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले. भ्रष्टाचारी मंत्री, वाढती गुन्हेगारी, दुष्काळ यासह अनेक प्रश्नांवर उद्याच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रावादीने नेते अजित पवार यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील नागरिक सरकारवर नाराज आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात पाण्याचा तुटवडा आहे. सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत, पण काम प्रत्यक्षात दिसत नाहीत. गल्ली ते दिल्ली युतीचे सरकार आहे. हे सरकार इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांच्याकडे माणसे नाहीत का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.

या सरकारवर पूर्वी ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना या सरकारने मंत्री केले. मात्र या सरकारला भ्रष्टाचारासंदर्भात उत्तरे द्यावी लागतील. केवळ सहा मंत्र्यांना काढून चालणार नाही. फडणवीस सरकारमध्ये अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहे. या साऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही अजित पवारांनी केली.

पश्चिम बंगालमध्ये ‘राज ठाकरे’ पॅटर्न; ‘बंगालमध्ये राहायचं असेल ‘बांग्ला’ आलंच पाहिजे’

कोलकाता: लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारल्यानंतर ममता बॅनर्जी अनेक मुद्यांवरून चर्चेत येत आहेत. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायला पाहिजे, असा नारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दिला होता. तोच नारा आता मामता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये दिला आहे. बंगालमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ‘बांग्ला’ आलंच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्रमक रूप गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

“मी ज्या राज्यात जाते तेव्हा तिथली भाषा बोलते. बंगालमध्ये राहणाऱ्यांना ‘बांग्ला’ यायलाच हवी. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कुणालाही बिघडवता येणार नाही. देशभरातून अनेक समाजकंटक कोलकात्यात येतात आणि फिरतात हे मी चालू देणार नाही”

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद- सरकारच्या मालकिची जमीन हडपल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. ही जमीन मुंडेंनी आपल्या पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली आणि ही कृषी जमीन अकृषिक केली. असा आरोप याचिकाकर्ते आणि रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी केला होता, त्यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, तपासी अंमलदार अन्वर यांच्यावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले.

मी सुप्रीम कोर्टात दाद मागणार- धनंजय मुंडे
रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण काढल्याने राजाभाऊ फड यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. यातले याचिकाकर्ते राजा फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी नमूद केली.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस बाकी असताना, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.