‘एक देश, एक रेशन कार्ड’; देशात कुठेही मिळणार धान्य!

देशात सध्‍या ‘एक देश, एक निवडणूक’ ही चर्चा सर्वत्र सुरु असतानाच मोदी सरकारकडून नागरिकांना ‘एक देश, एक रेशन कार्ड’ या योजनेची तयारी सुरु केल्‍याची माहिती समोर आली आहे. याची माहिती केंद्रीय अन्‍न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे. सरकार याच दिशेने काम करत असल्‍याची माहिती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितली.

रेशन कार्डची पोर्टेबिलिटी करता येणार

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान म्‍हणाले की, देशभरात रेशन कार्डची पोर्टेबिलिटीच्‍या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना विशेष करुन प्रवशांना देशभरात कुठेही सार्वजनिक वितरण प्रणालीच्‍या माध्‍यमातून (PDS) रेशनधान्य मिळू शकेल.

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी गुरुवारी राज्‍यांच्‍या अन्न सचिवांची व सरकारी अधिकार्‍यांच्‍या बैठकीत ही माहिती दिली.

रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करा, अशी सूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकेल.

कशी असणार ही नवीन व्‍यवस्‍था

या नवीन व्‍यवस्‍थेनुसार आपणास देशभरात एकाच राशन कार्डचा वापर करता येणार आहे. तसेच बनावट रेशनकार्ड तयार करणार्‍यांच्‍यावरही लक्ष ठेवण्‍यात येणार आहे. आधार कार्डप्रमाणेच रेशन कार्डला एक विशिष्ट (यूनिक) ओळख नंबर दिला जाणार आहे. यामुळे बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. यासाठी एक ऑनलाइन एकीकृत (इंटेग्रेटेड) सिस्टीम बनवणार आहेत. यामध्‍ये रेशनकार्डचा डेटा (माहिती) साठवली जाणार आहे. यामुळे बनावट रेशनकार्ड तयार करण्‍याचा प्रयत्‍न केला तर या सिस्‍टीमच्‍या माध्‍यमातून समजू शकेल.

या नवीन सिस्‍टीममुळे एक मोठा फायदा असा होणार आहे की, लाभार्थी देशातील कोणत्‍याही ठिकाणी कोणत्‍याही रेशनच्‍या दुकानात अनुदानित धान्‍य घेऊ शकेल. ही ऑनलाईन व्‍यवस्‍था तयार झाल्‍यास, नोकरीनिमित्त दुसर्‍या राज्‍यात गेलेल्‍या लोकांना रेशन मिळण्‍याची सुविधा होणार आहे. याचा मोठ्‍या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे.

https://www.taboola.com/rend-demo?url=https%3A%2F%2Ffeed.taboola.com%2Ffeed-yourshttps://www.taboola.com/rend-demo?url=https%3A%2F%2Ffeed.taboola.com%2Ffeed-yours