राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

PicsArt_11-02-10.09.35

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15-20 मिनिटं चर्चा झाली. मात्र या भेटीत नेमकं काय झालं? हे अद्याप समोर आलेलं नाही.

विधानसभा निकालानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’  निवासस्थानी जाऊन भेट दिली आहे. यावेळी राज ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन आले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती असे बोलले जात आहे. मात्र, तरी देखील या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना मोठ्याप्रमाणावर उधाण आलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याचवेळी राज ठाकरे  व  शरद पवार यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर  सोमवारी शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणांची उलथापालथ होण्यीची  शक्यता वर्तवण्यात येत आहेत, त्यात आता राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने याला अधिक महत्त्व आलं आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला आहे. मात्र, राज्यात सत्ता समीकरणं बदलली किंवा नाही बदलली तरी मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं बोललं जात आहे.