जनादेश महायुतीलाच;राज्यपालांची घेणार भेट-सुधीर मुनगंटीवार

%243%6%%%6%

images (37)

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल आठवडा उलटला आहे. दिवाळीनंतर सरकार स्थापन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी ताणून धरली. तर मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही, अशी भूमिका भाजपानं घेतल्यानं चर्चा फिस्कटत गेली. त्यामुळं सरकार युतीचं येणार की नाही असा प्रश्न राजकीय वर्तुळात चघळला जात होता. त्यात आम्ही मुख्यमंत्री पदावर ठाम असून, सत्तेच्या समसमान वाटपाशिवाय चर्चा नाही, असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, सरकार महायुतीचं येणार असं सांगत भाजपानं गौप्यस्फोट केला आहे.

“राज्यातील निवडणुकांवरही बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवरही चर्चा करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील निवडीचा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षांचीही निवड करण्यात येणार आहे. तसेच ९१ हजार ३७० बुथ अध्यक्षांच्या नेमणूक करण्यात येणार,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सरकार स्थापन करण्याविषयी मुनगंटीवार म्हणाले, “जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. आम्ही भूमिकेशी ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (गुरूवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. आमचा फॉर्म्युला ठरला असून, योग्य वेळी सांगितला जाईल. जी नाराजी आहे. ती दूर केली. अंधेरा ढलेगा, उजाला आयेगा,” असं सांगत मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.