‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतिक्षित व बहुचर्चित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. पानिपत येथे झालेल्या पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यादरम्यान झालेल्या पानिपतच्या युद्धासंदर्भात हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. आज (मंगळवारी) दुपारी बारा वाजता गोवारीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली. संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. मात्र अनेकांना हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मराठीमध्ये गोवारीकर यांनी मराठ्यांचा इतिहास मांडायला हवा होता अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हा चित्रपट मराठीमध्ये डब करावा अशी मागणी केली आहे.

भव्यदिव्य स्वरुपात गोष्ट मांडणारे दिग्दर्शक म्हणून गोवारीकरांना यांना ओळखले जाते. पुन्हा तसाच भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणल्याचे ट्रेलरची सुरुवात पाहताच लक्षात येते. या ट्रेलरमध्ये सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त तर क्रिती सनॉन पार्वतीबाईंची भूमिकेत दिसणार आहेत. या ट्रेलरमधील भव्यदिव्यपणा डोळे दिपवून टाकणार आहे. ट्रेलरमधील संवादही दमदार आहेत. मात्र एका मराठी दिग्दर्शकाच्या नजरेतून साकारण्यात आलेला मराठ्यांच्या पराक्रमावर भाष्य करणारा हा चित्रपट मराठीमधुन बनवायला हवा होता अशा अनेक प्रतिक्रिया गोवारीकर यांच्या ट्विटवर मराठी प्रेक्षकांनी दिल्या आहेत.