देशभरातील नागरिकांनी निकालाचा आदर करायला हवा –शरद पवार

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, यामुळे देशासमोर जी गंभीर समस्या होती. यावर तोडगा काढण्यासाठी नक्कीच मदत होईल. मी या देशातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की, एक महत्वपूर्ण निकाल आलेला आहे, याचे स्वागत व सन्मान सर्वांनीच करायला हवा. तसेच, देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आहे.

<br>

अयोध्या खटल्यावर आज निकाल

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता लागणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निकाल २०१०मध्ये अलाहाबाद खंडपीठाने दिला होता. त्यानुसार, रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात या जमिनीचे वाटप करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एकूण १४ आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने न्या. एफ. एम. खलिफुल्ला, श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पांच्छू यांची समिती नेमून अयोध्या प्रकरणाचा वाद सामोपचाराने मिटवण्यास परवानगी दिली होती, मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने सलग सुनावणी घेऊन खटल्याचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला. वादग्रस्त २.७७ एकर जमीन ही रामजन्मभूमी असल्याने सर्व जमिनीचा ताबा देण्याची मागणी खटल्याशी संबंधित हिंदू याचिकाकर्त्यांनी केली होती. त्या मागणीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता.

सुरक्षा आढाव्यानंतरच निकाल दिवस निश्चित

अयोध्येचा खटला राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील असल्याने निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी अयोध्या तसेच, संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्या नंतरच निकालाचा दिवस निश्चित केला. शनिवार-रविवारी न्यायालयाचे कामकाज बंद असते. पण, अयोध्या खटल्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शनिवार निकाल देण्याचे ठरवले. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी न्या. गोगोई यांची भेट घेऊन त्यांना कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली होती. दिल्लीसह देशभर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शांततेचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.