भाजपाचा सत्तास्थापनाच्या दाव्यास नकार, शिवसेनेला शुभेच्छा

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळांने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार,पंकजाताई मुंडे या बड्या नेत्यांचा समावेश होता. राज्यपालांसोबत बैठक झाल्यानंतर भाजपच्या या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आमची राज्यपालांशी चर्चा झाली. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्यास नकार दिला आहे,जर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर सरकार स्थापन करत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा असंही यावेळी सांगण्यात आले.

मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवणार – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार, महाराष्ट्रात आपलचं सरकार येणार आहे. मुंबईतील मालाड येथील हॉटेल द रिट्रिटमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना असा विश्वास दिला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, आपण अजुनही युती तोडलेली नाही असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले असल्याचेही सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त असून, त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागल्याचे दिसत आहे. हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांबरोबर त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. तर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाळपासून आमदारांबरोबरच असून ते देखील आमदारांचे मत जाणून घेत होते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने आता उद्धव ठाकरे आमदारांशी नेमकी काय चर्चा करणार? चर्चेनंतर कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादीच्या बळावर करणार का सत्ता स्थापन?

दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे.

भाजपा सत्तेच्या बळाचा दावा करणार का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “अजून निर्णय झालेला नाही. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,”अशी माहिती त्यांनी दिली.

भाजप कोअर कमिटीची आज बैठक

Getty Images

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सत्तास्थापनेचा खेळ आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली असून सत्ता स्थापन करायची असेल तर होकार कळवा, असा संदेश पाठवला. यानंतर भाजप कोअर कमिटीने रविवारी बैठक बोलावली आहे. यात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्याने महायुती सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होते की काय, अशी स्थिती होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली आहे.

  • सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलावले

२०१४ मध्ये भाजप मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी स्वत: सत्तास्थापनेचा दावा केला होता. आवाजी मतदानाने बहुमतही सिद्ध केले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. या वेळी अल्पमतातील सरकार स्थापन करायचे नाही व फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिवसेना आमदार हॉटेलमध्ये

राज्यपालांनी भाजपकडे सत्तास्थापनेबाबत विचारणा केल्याचे वृत्त येताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे मढ येथील हॉटेल रिट्रिटमध्ये ठेवलेल्या शिवसेना आमदारांची भेट घेण्यास रवाना झाले.

काँग्रेसच्या ३५ आमदारांची जयपुरला रवानगी : काँग्रेसचे ८ आमदार गुरुवारी जयपुरात होते. ती संख्या आता ३५ झाली. सोनिया गांधी यांच्या भेटीला दिल्लीला गेलेला आमदारांचा एक गट शनिवारी येथे पोहोचला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही जाणार असल्याचे समजते.