भाजप कोअर कमिटीची आज बैठक

Getty Images

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सत्तास्थापनेचा खेळ आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली असून सत्ता स्थापन करायची असेल तर होकार कळवा, असा संदेश पाठवला. यानंतर भाजप कोअर कमिटीने रविवारी बैठक बोलावली आहे. यात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्याने महायुती सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होते की काय, अशी स्थिती होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली आहे.

  • सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलावले

२०१४ मध्ये भाजप मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी स्वत: सत्तास्थापनेचा दावा केला होता. आवाजी मतदानाने बहुमतही सिद्ध केले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. या वेळी अल्पमतातील सरकार स्थापन करायचे नाही व फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिवसेना आमदार हॉटेलमध्ये

राज्यपालांनी भाजपकडे सत्तास्थापनेबाबत विचारणा केल्याचे वृत्त येताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे मढ येथील हॉटेल रिट्रिटमध्ये ठेवलेल्या शिवसेना आमदारांची भेट घेण्यास रवाना झाले.

काँग्रेसच्या ३५ आमदारांची जयपुरला रवानगी : काँग्रेसचे ८ आमदार गुरुवारी जयपुरात होते. ती संख्या आता ३५ झाली. सोनिया गांधी यांच्या भेटीला दिल्लीला गेलेला आमदारांचा एक गट शनिवारी येथे पोहोचला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही जाणार असल्याचे समजते.