अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकीय अभूतपूर्व गोंधळानंतर आज (१२ नोव्हेंबर) अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्रातील एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करु न शकल्याने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यांच्या या शिफारशीला अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. या आदेशावर संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान राष्ट्रपतींनी सही केली असून आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 

राज्यपालांनी केलेल्या शिफारसीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. याच बैठकीत राज्यपालांनी केलेल्या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी देखील मिळाली. त्यानंतर याबाबतच्या आदेशावर राष्ट्रपतींनी आपली स्वाक्षरी केली आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप, त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना आणि तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण दिलेलं होतं. पण हे तीनही पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. जी शिफारस आता मान्य झाली आहे. त्यामुळे आता राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या हाती आला आहे. त्यांच्याच देखरेखीखाली आता महाराष्ट्रातील राज्यशकट हाकलं जाणार आहे.

बहुमताचा आकडा एकाही पक्षापाशी नसल्याने कुणा तरी पक्षाच्या मदतीने राज्यात सत्ता बनविणं क्रमप्राप्त आहे. अशावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्र येऊन समान किमान कार्यक्रम ठरवून आणि सत्तेतील पदांच्या वाटपाबाबत चर्चा करुन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करावी लागेल. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागू झाली असली तरीही हे तीनही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. त्यामुळे आता हे तीन पक्ष एकत्र येणार की, भाजप काही नवी खेळी करुन पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

त्यासाठी २४ तासांचा वेळ पुरेसा नाही. त्यामुळे राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती. पण राज्यपालांनी ही मागणी नाकारल्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु झाली आहे.

रुग्णालयातूनही संजय राऊतांची लेखणी सुरूच, अग्रलेख लिहितांनाचा फोटो व्हायरल

शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत हे आजारी असूनही त्यांची शिवसेनेसाठी असलेली लढाई सुरूच आहे. त्यांनी आज सकाळी ‘लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती… बच्चन, हम होंगे कामयाब… जरूर होंगे’ असं ट्विट केलं. सध्या राऊत लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. मात्र सोमवारी रुग्णालयात दाखल केल्याने आज ते पत्रकार परिषद घेऊ शकले नाही. मात्र रुग्णालयातही त्यांची लेखणी थांबलेली नाही. रुग्णालयाच्या बेडवरुन ते सामनासाठी अग्रलेख लिहित आहेत.

त्यांच्या हातावर डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत.

सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयामधूनही त्यांची पत्रकारिता सुरूच आहेत. रुग्णालयात बसून उद्यासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत रुग्णालयाच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातावर डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत. याही अवस्थेत संजय राऊत शिवसेनेला सत्तास्थापनेत सहभागी करण्यासाठी सक्रीय दिसत आहेत.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सोमवारी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा केला मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐन वेळी पाठिंबा पत्र न दिल्यामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहे. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपाचे ७ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, अजित पवारांना केलेत फोन

सत्तास्थापनेस असमर्थ ठरल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे ७ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत तर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.निवडणूकीपूर्वी यांनी मेगाभरतीमध्ये भाजपात प्रवेश केला होता.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी 2 आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून मोठा संघर्ष निर्माण झाला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मात्र सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे मग निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रित म्हणजे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरू केल्याची माहिती आहे.

सर्वसाधारणपणे अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतात. आता राज्यात सत्तेचं समीकरणच बदलत असल्याने आधी पाठिंबा दिलेले आमदारही भाजपला धक्का देत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याने आता अपक्ष आमदार भाजपची साथ सोडून इतर पक्षात जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.