अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकीय अभूतपूर्व गोंधळानंतर आज (१२ नोव्हेंबर) अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्रातील एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करु न शकल्याने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यांच्या या शिफारशीला अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. या आदेशावर संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान राष्ट्रपतींनी सही केली असून आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 

राज्यपालांनी केलेल्या शिफारसीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. याच बैठकीत राज्यपालांनी केलेल्या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी देखील मिळाली. त्यानंतर याबाबतच्या आदेशावर राष्ट्रपतींनी आपली स्वाक्षरी केली आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप, त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना आणि तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण दिलेलं होतं. पण हे तीनही पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. जी शिफारस आता मान्य झाली आहे. त्यामुळे आता राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या हाती आला आहे. त्यांच्याच देखरेखीखाली आता महाराष्ट्रातील राज्यशकट हाकलं जाणार आहे.

बहुमताचा आकडा एकाही पक्षापाशी नसल्याने कुणा तरी पक्षाच्या मदतीने राज्यात सत्ता बनविणं क्रमप्राप्त आहे. अशावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्र येऊन समान किमान कार्यक्रम ठरवून आणि सत्तेतील पदांच्या वाटपाबाबत चर्चा करुन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करावी लागेल. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागू झाली असली तरीही हे तीनही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. त्यामुळे आता हे तीन पक्ष एकत्र येणार की, भाजप काही नवी खेळी करुन पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

त्यासाठी २४ तासांचा वेळ पुरेसा नाही. त्यामुळे राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती. पण राज्यपालांनी ही मागणी नाकारल्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु झाली आहे.