रुग्णालयातूनही संजय राऊतांची लेखणी सुरूच, अग्रलेख लिहितांनाचा फोटो व्हायरल

शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत हे आजारी असूनही त्यांची शिवसेनेसाठी असलेली लढाई सुरूच आहे. त्यांनी आज सकाळी ‘लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती… बच्चन, हम होंगे कामयाब… जरूर होंगे’ असं ट्विट केलं. सध्या राऊत लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. मात्र सोमवारी रुग्णालयात दाखल केल्याने आज ते पत्रकार परिषद घेऊ शकले नाही. मात्र रुग्णालयातही त्यांची लेखणी थांबलेली नाही. रुग्णालयाच्या बेडवरुन ते सामनासाठी अग्रलेख लिहित आहेत.

त्यांच्या हातावर डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत.

सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयामधूनही त्यांची पत्रकारिता सुरूच आहेत. रुग्णालयात बसून उद्यासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत रुग्णालयाच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातावर डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत. याही अवस्थेत संजय राऊत शिवसेनेला सत्तास्थापनेत सहभागी करण्यासाठी सक्रीय दिसत आहेत.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सोमवारी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा केला मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐन वेळी पाठिंबा पत्र न दिल्यामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहे. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.