रिलायन्स इंडस्ट्रीज सुरू करणार डिजिटल कंपनी, अमेझॉन- फ्लिपकार्टला टक्कर देणार नवी योजना

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता दिग्गज ई-कॉर्मर्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. वृत्तानुसार, ते २४०० कोटी डॉलरची डिजिटल कंपनी सुरु करणार आहेत. देशाच्या इंटरनेट शॉपिंग क्षेत्रातील त्यांच्या साम्राज्याचा मार्ग ही कंपनी प्रशस्त करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (आरआयएल) मंडळांने पूर्ण मालकीच्या या सहायक कंपनीत १५०० कोटी डॉलर (सुमारे १.०८ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. ही सहायक कंपनी रिलायन्स समुहातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम या दुरसंचार कंपनी गुंतवणूक करणार आहे. योजनेनुसार या सहायक कंपनीतून जिओत भांडवलाचे हस्तांतरण अनेक टप्प्यांत होईल. अशारितीने मार्च २०२० पर्यंत जिओ पूर्णपणे कर्जमुक्त होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. जिओवर सध्या सुमारे ८४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.


पत्रकानुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग्ज लिमिटेड आणि अल्फाबेच इंक प्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज पर्यायी रुपांतरित प्राधान्य समभागाच्या माध्यमातून या होल्डिंग गुंतवणूक करेल. पालक कंपनीकडून जिओमध्ये करण्यात आलेल्या ६५ हजार कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीचे अधिग्रहण ही होल्डिंग कंपनीकरेल. यामुळे स्पेक्ट्रमचे देणे वगळता जिओ कर्जमुक्त होईल. नवी सहायक कंपनी झाल्यामुळे रिलायन्सचा सर्व डिजिटल व्यवसाय आणि अॅप एका कंपनी अंतर्गत येईल. यात माय जिओ, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, िजओ न्यूज आणि जिओ सावन यासारख्या अॅपच्या समावेश आहे. याशिवाय हेल्थकेअर, शिक्षण यासारख्या क्षेत्रांत ही कंपनी तंत्राज्ञानाच्या आधारे काम सुरू ठेवेल. याच बरोबर पुढील पिढीचे तंत्र अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, व्हर्च्युअल आणि आगमेंटेड रियलिटी आदीवरही काम करेल.

डेटा – डिजिटल सेवा रिलायन्सचे वृद्धी क्षेत्र

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ९.०९ लाख कोटी रुपये आहे. सध्या ही कंपनी तेलपासून ते पेट्रोकेमिकलच्या व्यवसायात कार्यरत आहे. मात्र,डेटा आणि डिजिटल सेवा आगामी काळात रिलायन्स समुहाच्या विस्ताराचे क्षेत्र राहील असे संकेत नव्याने उचलेल्या पावलावरून दिसताहेत. ही कंपनी, अमेझॉन डॉट इन आणि वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्ट डॉट कॉम प्रमाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उभारणार आहे. रिटेलसह नवे व्यवसाय रिलायन्स समुहाच्या उत्पन्नात ३२ टक्के वाटा उचलत असल्याचे मुकेश अंबानी यांनी ऑगस्टमध्येत समभागधारकांना सांगितले होते.