ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे मौनव्रत

पारनेर : महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन सुनावणी व शिक्षेची प्रक्रिया जलद व्हावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत धारण करणार आहेत. यासंदर्भात हजारेंनी १० डिसेंबरला पंतप्रधानांना, तर १३ डिसेंबरला राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे.


पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे की, हैदराबादमध्ये तरुणीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून ठार केले. त्यानंतर देशातील जनतेने आनंद व्यक्त केला. पोलिस व न्यायालयीन प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे जनतेने या एन्काउंटरनंतर आनंदोत्सव साजरा केला. याचाच अर्थ न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ लागला आहे. न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे जनतेत आक्रोश आहे.


पोलिसांचा तपास, तपासानंतर न्यायालयात होणारी सुनावणीची प्रक्रिया सुलभ व जलद असली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाइनचे काम योग्य असले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने पोलिस दलात सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या सूचनांवर तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. सन २०१२ पासून प्रलंबित ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल तत्काळ मंजूर झाले पाहिजे. त्यासाठी सरकारने न्यायाधीशांची रिक्त पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे.