गोकुळ निवडणुकीत विनय कोरे करणार महाडीक गटाला मदत

कोल्हापूर : संस्थांचे ठराव गोळा करण्यास सुरुवात झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणात रोज वेगवेगळे कंगोरे सामोरे येत आहेत. आमचं ठरलंय म्हणत सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज उठवणाऱ्या विरोधी गटातील विनय कोरे हेदेखील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड म्हणून कर्णसिंह गायकवाड यांना संचालकपद मिळवून देण्यासाठी कोरे यांनी ही भूमिका घेतली आहे.

विरोधी गटातील प्रमुख शिलेदार असलेले विनय कोरे हेदेखील महाडिकांच्या बाजूने झाले आहेत. त्यांच्या संस्था गोकुळशी संलग्न नसल्या तरी त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुमारे शंभरावर संस्थांचे ठराव आपल्याकडे वळवू शकतात. शाहूवाडीमध्ये सर्जेराव पाटील पेरिडकर यांच्याकडे जास्त ठराव आहेत.

          या जोरावरच त्यांनी एखादी जागा मिळावी म्हणून सत्ताधा-यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी मतदारसंघात कर्णसिंह गायकवाड यांनी मदत करण्याच्या बदल्यात गोकुळच्या संचालकांचा शब्द दिला होता. आता त्याची पूर्तता करण्यासाठीच कोरे यांनी सत्ताधाऱ्यांशी संधान साधले आहे.

गतवेळी क्रॉस व्होटिंगच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फुटला असल्याने सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीपासून सावध भूमिका घेत ठराव गोळा करतानाच बऱ्यापैकी चित्र आपल्या बाजूने तयार करून घेतले आहे.

विनय कोरे गटाचे ठराव (अंदाजित)

  • शाहूवाडी : ७०
  • पन्हाळा : २५
  • हातकणंगले : १०

सत्तेत स्थान न मिळाल्याने आघाडीतील घटक पक्ष नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे. विधानभवनाच्या परिसरात शपथविधी सोहळा पार पडेल. आज महाविकास आघाडीतील एकूण 36 मंत्री शपथ घेतील. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आघाडीतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे घटक पक्ष नाराज असल्याचं समोर आलं आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे घटक पक्ष नाराज झाले आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, भाकप, बहुजन विकास आघाडी, प्रहार यांचा समावेश असल्याचं कळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्ष, प्रहारचे बच्चू कडू आदी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर इतर पक्षांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसह निवडणुकीत आघाडी केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. 

अजित पवारांसह ३५आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात पार पडला. एकूण ३६ मंत्र्यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळं वळण देणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.