सत्तेत स्थान न मिळाल्याने आघाडीतील घटक पक्ष नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे. विधानभवनाच्या परिसरात शपथविधी सोहळा पार पडेल. आज महाविकास आघाडीतील एकूण 36 मंत्री शपथ घेतील. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आघाडीतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे घटक पक्ष नाराज असल्याचं समोर आलं आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे घटक पक्ष नाराज झाले आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, भाकप, बहुजन विकास आघाडी, प्रहार यांचा समावेश असल्याचं कळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्ष, प्रहारचे बच्चू कडू आदी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर इतर पक्षांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसह निवडणुकीत आघाडी केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती.