कोल्हापूरात पीएन पाटील समर्थक नाराज,एकनिष्ठा हरली,पैसा जिंकला

images (5).jpeg कोल्हापूरात पीएन पाटील गटाचा कार्यकर्ता मेळावा
पीएन पाटील कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

कोल्हापूर : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (30 डिसेंबर) पार पडला. यावेळी विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. मात्र, राज्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव जाहीर होताच काँग्रेसचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. काँग्रेस पक्षासोबत तब्बल 40 वर्ष एकनिष्ठ राहूनही मंत्रिपद न मिळाल्याने पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

kolhapur-satej-patil-p-n-patil

आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये एक तराजू दाखवण्यात आला आहे. या तराजुच्या एका पारड्यात पैसे आणि दुसऱ्या पारड्यात 40 वर्षांची पक्षनिष्ठा दाखवण्यात आली आहे. यामध्ये पैशाचं पारडं हे जड असल्याने ते झुकलेलं दाखवलं आहे, तर पक्षनिष्ठतेचं वजन कमी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा फोटो अनेक पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटसला अपलोड केला आहे.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला घवघवीत यश मिळालं. यात काँग्रेसला चार ठिकाणी विजय मिळाला. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर काँग्रेस पक्षाशी 40 वर्षाहून अधिक काळ एकनिष्ठ असलेले आमदार पी. एन. पाटील आणि विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच होती. पी. एन. पाटील यांच्यासाठी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी तर सतेज पाटील यांच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी वरिष्ठांची भेट घेतली होती. एप्रिल महिन्यात होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. अखेर सतेज पाटील यांनी यात बाजी मारत राज्यमंत्रिपद मिळवलं.

आमदार पी. एन. पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं, त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. आज सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यातही पी. एन. पाटील समर्थकांकडून व्हायरल केला जाणारा तराजुचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘आजचा सुविचार’ या नावाने व्हायरल होणारा हा फोटो दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत चढाओढ दर्शवणारी ठरत आहे.