सांगली :- आमदार विश्वजित कदम यांनी सोमवारी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच सांगली आणि त्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघासह जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या विधानसभा मतदार संघात फटाक्यांची आतषबाजी करुन पेढे वाटण्यात आले. अनेक कार्यकर्ते मुंबईत शपथविधीसोहळ्यात उपस्थित होते.
पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची खात्री सोमवारी सकाळीच झाली होती. त्यामुळे मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यात आनंदात होते. विश्वजित कदम यांच्या या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रविवारी रात्रीच मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते. सोमवारी दुपारी राज्यमंत्री म्हणून कदम यांनी शपथ घेतली आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कडेगाव शहर व तालुक्यात गावोगावी कार्यकर्त्यांनी पेढे आणि साखर वाटून आणि फटाक्यांची िअतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
सांगलीत कदम यांच्या अस्मिता या निवासस्थानासमोर काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उदय शिंदे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.