कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

PicsArt_01-02-05.21.37.jpgकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीने भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला. अरुण इंगवले यांना 24 तर बजरंग पाटील यांना 41 मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

जिल्हा परिषदेतील या निकालामुळे भाजप कोल्हापुरातून हद्दपार झाली आहे. कारण कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. शिवाय दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. याशिवाय महापालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. केवळ कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र अडीच वर्षात ती सत्ता सुद्धा हातातून निसटली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडीने एकत्र येऊन कोल्हापूर झेडपीतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला होता. त्यामध्ये त्यांना यश आलं. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानंतर आता अडीच वर्षे विरोधात राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने सत्ता काबीज करण्याची तयारी केली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपने स्थानिक आघाड्यांना एकत्र करत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.

महाविकास आघाडीमुळे भाजपला जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता टिकवणे प्रतिष्ठेचे बनले होते. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला सोबत घेण्याची रणनीती आखली. त्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी प्रदेश पातळीवरून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे एक तारखेला आम्ही बहुमताच्या पुढे असू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीने भाजपची सत्ता उलथवून लावली आहे.

कधीकाळी एखादा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाजपला अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 67 पैकी तब्बल 14 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही या निवडणुकीत 14 जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी बरोबरच स्थानिक आघाड्यांना एकत्र घेण्यात काँग्रेस मागे पडली आणि इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच  इतर स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन भाजपने 34 आकडा गाठून आपलं बहुमत सिद्ध केलं आणि अध्यक्षपदाची माळ भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्या गळ्यात पडली होती. मात्र शैमिका महाडिक या अडीच वर्षेच अध्यक्षपदी राहिल्या.