नामदार बच्चू कडू यांचा दणका,कामचुकार तहसिलदार निलंबित

 

अमरावती-राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बच्चू कडू यांनी मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्याच दौऱ्यात दोन अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. बच्चू कडू यांनी अमरावती येथील दर्यापूर तहसील कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश त्यांनी दिले आहेत. निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्यावर नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बच्चू कडू हे आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. ३० डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. अद्याप त्यांच्याकडे कोणते खाते आहे याचीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आपल्या पहिल्याच दौऱ्यात दोन अधिकाऱ्यांना त्यांनी दणका दिला आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील कार्यालयात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. त्यांच्या अचानक भेटीमुळे तहसील कार्यालयाचे धाबे दणाणले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तातडीने आढावा बैठकीचं आयोजन करा असं सांगितलं. या आढावा बैठकीमध्ये तहसील कार्यालयाच्या अंतर्गत रखडलेल्या कामांची राज्यमंत्र्यांनी माहितीही घेतली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभाग या दोन विषयांवर तब्बल तासभर बैठक झाली. काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना विभाग आणि पुरवठा विभागात वारंवार चकरा मारुनही आमचे काम झाले नाही अशी तक्रार थेट बच्चू कडू यांच्याकडे केली. ज्यानंतर बच्चू कडू यांनी तातडीने दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.