राज ठाकरे हिंदुत्ववादी भूमिकेत, पक्षाचा ध्वज बदलणार

PicsArt_01-06-06.34.33

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल.

मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल.

मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. कदाचित शिवसेना ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे हा पक्ष स्थापन होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु या 14 वर्षांमध्ये मनसेच्या वाट्याला यशापेक्षा अपयशाचे झेंडेच हाती घ्यावे लागले आहेत. 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेनं 13 आमदार निवडून आणले. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई महापालिकांमध्येही मनसेला मोठं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांचे दारुण पराभव झाले.

2014 नंतर पक्ष अजूनच अपयशी ठरु लागला. 2014 साली तर राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत मनसेला केवळ एकच आमदार निवडून आणता आला. मुंबई महापालिकेमध्ये तर राज ठाकरे यांच्या पक्षाचा केवळ एकच नगरसेवक आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेचा केवळ एक नगरसेवक शिल्लक आहे. 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 28 नगरसेवक होते.

पाच वर्ष मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती. (2012 मध्ये नाशिकमध्ये मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते.) परंतु नाशिक महापालिकाही मनसेच्या हातून निसटली. (2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले.)

सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कधी मराठी माणसांसाठी, कधी हिंदूंसाठी, तर कधी सर्वांसाठीच मनसे धावून गेली. परंतु कोणताही एक समाज मनसेचा होऊ शकला नाही. त्यामुळे राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याचे बोलले जात आहे.

मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत का? हे 23 तारखेलाच कळेल, कारण 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याचे बोलले जात आहे.