‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता लगावला आहे.  ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असणाऱ्या टीकेला उदयनराजेंनी उत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदींशी करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाश काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडले. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिवाजींच्या वंशजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आज (मंगळवारी) पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

बुद्धी गहाण ठेवली आहे का?

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा मला प्रश्न पडतो. या पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मी या कुटुंबामध्ये जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे मला याचा अभिमान आहे. महाराजांबद्दल कोणीही उठसूट यायचं आणि काहीही बोलायचं असं चालणार नाही,” असं उदयनराजे म्हणाले.

“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असे उदयनराजे म्हणाले.