नाशिकमध्ये अपघात, बस आणि रिक्षा विहिरीत कोसळली,

नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधील तीन प्रवासी ठार असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघात होताच समोरील हॉटेलवर थांबलेले देवळा रहिवासी असलेले शिक्षक संजय सदिशिव देवरे व शेतमालक गणेश देवरे यांनी बसमधील जखमींना तातडीने बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासह पोलीस यंत्रणा व रुग्ण वाहिका तातडीने घटना स्थळी हजर झाल्या. आमदारांनीही स्थानिकांची मदत घेऊन मृतांना बाहेर काढलं.