
कोल्हापूर पोलीस आणि गुन्हेगारांच्या टोळीमध्ये धुमश्चक्री झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये गोळीबार झाला आहे. यावेळी एकमेकांवर झालेल्या बेछूट गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तसंच या चकमकीत दोन आरोपी जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमींसह तीन आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे. राजस्थान पोलिसांना चकवा देत सराईत गुन्हेगार दोन दिवसापूर्वी धारवाडमध्ये आले होते आणि याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोल्हापूरातील किणी टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला होता. दरम्यान या गुन्हेगारांवर वेगवेगळ्या प्रकरणी तब्बल 25 गुन्हे राजस्थान पोलिसात दाखल आहेत.
मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास हे आरोपी किनी टोल नाक्यावर पोहोचले. गुन्हेगारांच्या गाडीला रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार सुरू केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. यापैकी एकाला पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यात श्यामलाल गोवर्धन बिष्णोई (रा. जोहापूर, राजस्थान), सरवन मनोहरलाल बिष्णोई (२४) हे दोघे गँगस्टर गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे.
या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. टोलनाक्यावर अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली.